तालसुरांची तालयात्रा मैफलीने कल्याणकर मंत्रमुग्ध

कल्याण दि.२४ :- समेवर येणारी दाद, रेला, तुकडे, पढंत आणि विविध रचनांचे प्रभावी सादरीकरण आणि त्यानंतर अनोख्या फ्युजनचा आविष्कार याचा अनुभव कल्याणकरांनी शनिवारी घेतला. निमित्त होते होरायझन इव्हेंट्स आयोजित तालयात्रा या आगळ्यावेगळ्या मैफलीचे. कल्याणातील ऋषीतुल्य तबलाशिक्षक कै. वि. बा. अलोणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पं. योगेश समसी यांचे शिष्य, युवा पिढीतील नामवंत तबलावादक व गुरुबंधू स्वप्नील भिसे व यशवंत वैष्णव यांच्या सहवादनाने पहिल्या सत्राची सुरूवात झाली. वादनाची सुरूवात धा क्ड धा धिंना या पेशकाराने झाली. लयीशी खेळत सादर होणाऱ्या या पेशकाराने सुरवातीपासूनच मैफिलीचा ताबा घेतला. सर्वश्री झाकीर हुसेन, योगेश समसी, उस्ताद अल्लारखा, पं सुशीलकुमार जैन, उस्ताद फिरोज खान यांच्या रचना तसेच पंजाब घराण्याचा धीर धीर बोलांचा कायदा, लखनौ घराण्याचा रेला, छंद रेला अशा विविध अंगांनी वादन खुलत गेले. वादनातील संतुलन, लयकारी व गतिमानता या सर्वच पातळीवर हे सहवादन अत्त्युच्च ठरले. तर गुरुप्रसाद गांधी यांनी लेहऱ्याची समर्पक साथ केली.
आदित्य कल्याणपूर व सहवादक यांनी कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगवला. मुंबई फ्युजिक या नावाने सादर झालेल्या या वादनाची संकल्पना संपुर्णपणे मुंबईकर होती. सिद्धिविनायक, सी- लिंक, हाजी अली, मुंबई सीएसटी, माऊंट मेरी, गेट वे ऑफ इंडिया, अशा मुंबईतील विविध स्थळांची नावे घेऊन सादर झालेली सहाही रचनांनी रसिकांना खिळवून ठेवले. मानसकुमार (व्हायोलिन), वरद कठापुरकर (बासरी), शिखरनाद कुरेशी (जेम्बे), प्रशांत ओहोळ (की बोर्ड) व स्वतः आदित्य कल्याणपूर (तबला) यांच्यातला समन्वय व परस्पर पुरकता येवढी कमालीची होती की जणु काही हे सर्व अनेक वर्षे परस्परांबरोबर रियाझ करत आहेत असे वाटावे. तर ते संपू नये असे वाटत असतानाच या तालयात्रेची सांगता झाली. कार्यक्रमाचे नेपथ्य राम जोशी यांचे होते, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता आपटे यांनी केले.

आयोजकांचे कौतुक : खरे तर तालवाद्यांवर आधारित अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे हे एक धाडसच पण काहीतरी वेगळे रसिकांपुढे ठेवण्यासाठी प्रशांत दांडेकर आणि स्वप्निल भाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या आयोजनाबद्दल आणि उत्तम श्रोतृवर्गाबद्दल सर्वच कलाकार आणि रसिकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

आठवण दुर्गाडी किल्ल्याची : कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुंबईतील विविध ठिकाणांवर आधारित रचना सादर होत असताना रसिकांमधून कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याची आठवण करण्यात आली. यावर बासरीवादक वरद कठापुरकर यांनी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेत आयत्यावेळी उत्स्फूर्तपणे रसिकांसाठी बासरीवर गुणी बाळ असा…ही अंगाई सादर केली. रसिकांनीही कौतुकाने या रचनेला दाद केली.

Leave a Reply

Your email address will not be published.