कल्याण : नामांकित कंपन्या व बिल्डर्स लॉबीचा बँकेला साडेसहा कोटींचा गंडा; फसवणूकदारांविरुद्ध तक्रार

कल्याणमधील काॅसमाॅस बँकेला दोन खासगी कंपन्यासह बिल्डर्स लाँबी आणि २६ कर्जदारांनी संगनमत करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ कोटी ३० लाख रुपयांचा बँकेला चुना लावल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी काॅसमाॅस बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद भिकाजी बेदाडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने शहरातील बिल्डर्स लाँबीत एकच खळबळ उडाली आहे.

जुलै २०२१ पासून हे कर्ज मंजुरीचे प्रकरण सुरू असताना मे. कोरवी ॲग्रो, मे. क्रक्स रिस्क या कंपन्यांच्या संचालकांनी २६ कर्जदारांना कर्ज मिळून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या साहाय्याने बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले.

खळबळजनक बाब म्हणजे बँकेतून कर्ज मंजुरीतील मध्यस्थ उमेश भाईप, मे. कोरवी ॲग्रो प्रा. कंपनीचे संचालक कोकरे, मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंटचे संचालक आणि इतर २६ कर्जदार, श्री सिध्दीविनायक डेव्हलपर्स, श्री साईराज बिल्डर, साई सृष्टी बिल्डर, संस्कृती बिल्डर्स हे नामचीन बिल्डर्सची आरोपींमध्ये नावे असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी दिली आहे.

तपास अधिकारी विद्या पाटील यांनी सांगितले, मे. कोरवी ॲग्रो प्रा. लिमिटेड कंपनी स्थापन करुन संचालकांनी या कंपनीतील २६ कर्जदारांना कर्ज पाहिजे असा प्रस्ताव तयार केला. या कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ सल्लागार उमेश भाईप यांनी पुढाकार घेतला.

२६ कर्जदारांच्या घरांच्या किंमती तत्कालीन शीघ्रगणक दरापेक्षा वाढवून त्या आधारे कर्जदारांच्या जुन्या सदनिकांचे पुनर्विक्रीचे बनावट विक्रीपत्र आरोपी यादीतील मे. सिध्दीविनायक डेव्हलपर्स, साईराज बिल्डर्स, साई सृष्टी बिल्डर्स, संस्कृती बिल्डर्स यांनी तयार करुन दिली.

कर्जदारांना कर्ज मंजूर करताना कागदपत्र आणि त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी काॅसमाॅस बँकेने मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या तिऱ्हाईत कंपनीची नियुक्ती केली. क्रिक्स कंपनीने कर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन वास्तवदर्शी अहवाल बँकेला देणे आवश्यक होते.

परंतु, बँकेची फसवणूक करायची या एका इराद्याने एकत्र आलेल्या मे. कोरवी, मे. क्रक्स, विकासक आणि २६ कर्जदार यांनी संगनमत करुन कर्जासाठीची बनावट कागदपत्र तयार करुन ती खरी आहेत असे बँकेला भासवून बँकेकडून सहा कोटी ३० लाख १७ हजार रुपयांची कर्ज मंजूर करुन घेतले.

बँकेची हप्तेफेड सुरू होताच कर्जदारांना हप्ते भरण्यास टाळाटाळ सुरू केली. बँकेने या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्जदारांनी बनावट कागदपत्र दाखल करुन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हे प्रकरण अधिकच्या तपासासाठी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.