Kalyan ; चिमुरड्याच्या मृत्यू प्रकरणाला कलाटणी डॉक्टरला झोडपणे पडले महागात
डोंबिवली दि.२५ :- उपचारासाठी रुग्णालयात आणलेल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड करत डॉक्टरला झोडपल्याची घटना सोमवारी कल्याणात घडली होती. हॉस्पिटलची तोडफोड आणि डॉक्टरला मारहाण करणे हल्लेखोर पित्यासह दोघा कुटुंबियांना चांगलेच महागात पडले आहे. महात्मा फुले चौक पोलिसांनी मृत चिमुरड्याचे वडील नोमान काझी व त्याच्या सोबत असलेल्या दोघा कुटुंबियांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे.
हेही वाचा :- सकाळच्या सत्रात डोंबिवलीतून ४० लोकल सोडाव्यात डोंबिवलीकरांची मागणी
कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या मोहने परिसरात राहणारे नोमान काझी यांच्या शहझीन या दोन महिन्यांच्या मुलाची तब्येत खराब झाल्याने त्यांनी या मुलाला घेऊन उपचारासाठी कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटल गाठले. मुलाची परिस्थिती बघून डॉक्टरने औषध दिले. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करवून न घेता त्याला घरी नेण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला. या मुलाला परत घरी नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा :- नवीमुबई पोलीस आयुक्तांचा प्रताप न्याय मागण्यासाठी आलेल्या कुटुंबालाच केल अपमानित
ओव्हरडोस दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मुलाच्या कुटुंबीयांनी श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर तेथिल डॉक्टरला मारहाणही केली. या घटनेला काही तासांतच कलाटणी मिळाली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी चंद्रेश यादव या डॉक्टरने नोंदविलेल्या तक्रारीनुसार नोमान काझी आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोघा नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाने डॉक्टरकडून राजीनामा लिहून घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर डॉक्टरच्या विरोधात पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.