कल्याण ; खासगीकरणाविरुद्ध कडोंमपातील कर्मचारी कामगार सेना आक्रमक
कल्याण दि.१८ – कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने ब, क, ड आणि ह या चार प्रभागांतील कचर्याचे कंत्राट खासगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने विरोध कायम ठेवला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कामगारावर अन्याय होणार असून या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शेकडो कामगार पालिका मुख्यालातात जमले होते. यावेळी खासगीकरण रद्द करण्यासह अन्य प्रलंबित मागण्याबाबत निर्णय घ्या, -अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म्युनिसिप्ल कर्मचारी कामगार सेनेने प्रशासनाला दिला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली पूर्वचा पाणी पुरवठा मंगळवार ऐवजी शुक्रवारी बंद
कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील २ प्रभाग क्षेत्राचा कचरा उचलण्याचा ठेका दिलेल्या अंथोनी वेस्ट हॅन्डलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची हलगर्जी आणि कंपनीच्या कामगारांना पालिकेच्या गाळ्यात मारहाण करण्यात आल्याचा अनुभव गाठीशी असतानाही, पालिका प्रशासनाने अपुरे कर्मचारी आणि साहित्य असल्याचे कारण देत, महापालिका क्षेत्रातील १० पैकी ब, क, ड आणि ह या ४ प्रभाग क्षेत्रांमधील कचर्याचे कंत्राट खासगीकंपनीला देण्याचा निर्णय अंतिम केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवलीत `विजय दिनी` शिवसेनेने वाहिली शहीद जवानांना आदरांजली
या निर्णयाला कामगारांसह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने कडाडून विरोध केला आहे. आज या निर्णयाचा विरोध करण्यासाठी महापालिका मुख्यालयात कामगारांनी द्वारसभा घेतली. यावेळी महापालिकेने कंत्राटी वाहनचालक व सफाई कामगार नेमले असून त्याच धर्तीवर पालिकेच्या खाते, विभाग अथवा प्रभागातील कर पाणी आरोग्य साफसफाई, मार्केट या ठिकाणी आवश्यकतेनुसार ठोक पगारी कर्मचार्याची भरती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष प्रकाश पेणकर, रवी पाटील आदींसह पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.