तालसंग्राम ढोल-ताशा स्पर्धेला राज्यभरातून १३ पथकांचा समावेश कल्याण-डोंबिवलीकर रसिकप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण दि.०२ :- आरंभ प्रतिष्ठानच्या विद्यमाने तालसंग्राम 2020 या तिसऱ्या वर्षीच्या राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेला शनिवारी हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलाच्या पटांगणात सुरुवात झाली. केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, भारतीय सैनिकी स्कूलच्या संचालीका राजेश्वरी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यंदा या स्पर्धेसाठी गोवा, अंमळनेर, फलटण, नाशिक आदी भागांसह ठाणे, मुंबई, कोकण भागातून 13 पथकांचा समावेश झाला आहे.

मधल्या काळात डीजेचे सर्वत्र वेड पसरले होते. तथापी अलीकडच्या काळात डीजेचा ट्रेण्ड कमी-अधिक प्रमाणात बदलताना दिसत आहे. डीजेची जागा आता ढोल-ताशा पथकांनी घेतली आहे. तरुणांची मोठी फौज ढोल-ताशा पथकात दिसते. अभ्यास, कार्यालय सांभाळून ही मंडळी ढोल-ताशाचा सराव करतात. या ढोल-ताशा पथकांची सुरुवात सर्वप्रथम पुण्यात झाली. त्यापूर्वी गावा-गावांत सणासुदीला ढोल-ताशा आणि इतरही काही वाद्ये वाजवली जात असत.

पण शिस्तबद्ध आणि रुबाबदार ढोल-पथकांमुळे पारंपरिक मिरवणुकीकडे तरुणाईचा ओढा वाढला. हेच वारे मुंबई, नाशिक, नागपूरसारख्या शहरांच्या दिशेनेही वाहू लागले आणि बघता बघता इथे एकामागून एक ढोल-ताशा पथके तयार होऊ लागली. शिवजयंती, गुढीपाडवा, गणेशोत्सव या सणांदिवशी ढोल-ताशापथकांना सर्वाधिक मागणी असते. डोंबिवली तर महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी मानली जाते.

त्यामुळे डोंबिवलीकर तरुणांनी आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालसंग्राम 2020 चे आयोजन केले. तिसऱ्या वर्षीच्या राज्यस्तरीय ढोल-ताशा स्पर्धेला राज्यभरातून 13 पथकांनी भाग घेतला आहे. यामध्ये नासिकचे तालरुद्र, बेळगावचे धाडस, अंमळनेरचे नादब्रह्म, फलटणचे शिवरुद्र, मावळे आम्ही ढोल-ताशांचे, छावा, शिवस्वरुप, मावळे, आम्ही कांदिवलीकर, पार्लेस्वर, बदलापूरचे शिवसुत्र, जगदंब, नादब्रह्म आदी पथकांचा समावेश असून दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे.

प्रथम पारितोषिक दिड लाख, द्वितीय 1 लाख, तृतीय 50 हजार आणि उत्कृष्ठ ताशा, ढोल, ध्वज, टोल वादकांसाठी प्रत्येकी 10 हजार रुपयांची पारितोषिक विजेत्या पथकांना देण्यात येणार आहेत. त्यासोबत आकर्षक ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मान होणार आहे. या स्पधेर्ला राज्यशासनाचे विशेष निधी अंतर्गत सहकार्य मिळाले आहे. या क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ पुण्याचे रहिवासी सुजित सोमण, गणेश गुंड पाटील, निलेश कांबळे आदी या स्पधेर्चे परीक्षक होते.

तालसंग्रामची भरारी अशीच उत्तुंग होवो, अशा शब्दांत महापौर विनिता राणे यांनी, तर राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनामध्ये भारतीय सैनिकी स्कूलच्या कॅडेट्सना राष्ट्रासाठी काही क्षण या संकल्पनेंतर्गत सहभागी होता आले याचा आनंद असल्याचे मत भारतीय सैनिकी स्कूलच्या संचालीका राजेश्वरी शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर महापौर विनिता राणे यांच्यासमवेत, नगरसेविका ज्योती मराठे, प्रमिला चौधरी, मुकुंद तथा विशू पेडणेकर, साई शेलार, माजी नगरसेवक श्रीकर चौधरी, कॅप्टन सुदीप मिश्रा, भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. महापालिका उपायुक्त मिलींद धाट, प्रसाद ठाकुर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आमदार रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद तथा राजू पाटील, आमदार जगन्नाथ शिंदे, राज्य शासन, दिपेश म्हात्रे, महापालिका प्रशासन, आदींसह शहरातील नानाविध मान्यवर आणि संस्थांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published.