कल्याण-डोंबिवलीतही चालते वेठबिगारी ६ अल्पवयीन कामगारांची सुटका
डोंबिवली दि.२७ :- कल्याण-डोंबिवली परिसरात वेठबिगारी चालत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. बॅगेच्या कारखाने, वेल्डीगची दुकाने, चहाच्या दुकानांवर कमी मोबदल्यात अल्पवयीन मुलांना राबवून घेत असल्याचे आढळून येत होते. याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी ४, विष्णूनगर पोलिसांनी १, डोंबिवली पोलिसांनी १ अशा ६ अल्पवयीन मुलांची वेठबिगारीतून मुक्तता करून या मुलांना राबविणाऱ्या सबंधित ६ जणांच्या विरोधात फौजदारी कारवाई केली आहे. कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात असलेल्या साकेत कॉलनीमध्ये त्याच परिसरात सरगम हॉटेलच्या मागील बाबर कदम चाळीत बॅगेचे कारखाने आहेत. मंगळवारी कोळसेवाडी पोलिसांनी या तिन्ही कारखान्यावर छापे टाकले असता त्यांना या कारखान्यात अल्पवयीन मुलांकडून बॅगांना चेन बसवण्याचे काम करवून घेत असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा :- झोमॅटोवर जेवण मागविणे पडले महागात तरुणाला ४९.१६० हजारांचा गंडा
पोलिसांनी या प्रकरणी येथे लालुकुमार साव, मोहम्मद आबिद अब्दुल रेहमान अन्सारी आणि महेंद्र यादव या तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. तसेच काटेमानवलीतील हरिभाऊ पाडा येथे असलेल्या जयभोले फॅब्रिकेटर या वेल्डिंग दुकानात लोखंडी गज कटिंग करणे, रंगकाम करणे, बेंड काढणे, वेल्डिंग कामात मदत करणे अशी कामे अल्पवयीन मुलांकडून करवून घेण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी दुकानाचे मालक सुरेंद्र बैठा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. तर डोंबिवली पश्चिमेकडील चिंचोड्याचा पाडा भागातील भगत चाळीत श्रीराम टी स्टॉल या दुकानात अल्पवयीन मुलगा काम करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात विष्णू रावल या चहाच्या दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल केला. डोंबिवली पूर्वेकडे स्टेशन परिसरात असलेल्या हरीकृष्ण दाबेली या दुकानात अल्पवयीन मुलगा काम करत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात विजय गुप्ता विरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरु केला आहे.