पत्रकार विठ्ठल ममताबादे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित पत्रकार उत्कर्ष समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड.
उरण दि.२३ – पत्रकार उत्कर्ष समिती या पत्रकारांच्या न्याय हक्कसाठी लढणा-या पत्रकारांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दि 21/4/2019 रोजी पनवेल येथील आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या, भरीव योगदान दिलेल्या व्यक्तिंना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देउन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उच्चशिक्षित व सर्व सामान्य व्यक्तिंच्या समस्यांना पत्रकारितेतून वाचा फोडनारे पत्रकार विठ्ठल ममताबादे यांना समितीतर्फे सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देउन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविन्यात आले. तसेच पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कार वितरण सोहळया प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव-डॉ. वैभव पाटिल,मागासवर्गीय आयोग सदस्य मा. जस्टिस सी. एस. थूल,जिल्हा शल्य चिकीत्सक- डॉ.अजित गवळी,न्यूज नेशन टी वी. संपादक-सुभाष शिर्के,माजी विभागीय संचालक माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार-विजय कुमार गवई,महाराष्ट्र माझा चॅनल संपादक-जगदीश दगडे,ज्येष्ठ समाजसेवक गजानन पाटील,कामगार नेते संतोष घरत आदि मान्यवर उपस्थित होते. पत्रकार विठ्ठल नागनाथराव ममताबादे यांचा जन्म मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील चैनपुर या एका छोट्याश्या खेडेगावात शेतकरी कुटुंबात झाला. पुढे शिक्षणासाठी ते उरण मधील नगर परिषद मधील प्रसिद्ध कॉन्ट्रेक्टर तसेच त्यांचे काका सामाजिक कार्यकर्ते हीराप्पा शेठ ममताबादे यांच्याकडे सन 1990 साली उरण मध्ये स्थायिक झाले.पुढे नोकरीच्या निमित्ताने त्यांनी शिक्षकाचा अडीच वर्षाचा(D.T.E.d)कोर्स रत्नागिरी जिल्ह्यात पूर्ण केला.
ट्रेनिंगचा भाग म्हणून 6 महीने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून विद्यादानाचे पवित्र कार्य केले.पत्रकारिता क्षेत्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मधून डिग्री(पदवी),डिप्लोमा(पदविका)दोन्ही शिक्षण पूर्ण केले.हे करतच यशवंतराव चव्हाण नाशिक मुक्त विद्यापीठ मधुनच त्यांनी सामाजिक शास्त्र,शहरी समस्या, नागरी समस्या, ग्रामीण समस्या या विषयात पदवीचे(डिग्री)चे शिक्षण उत्तम गुणांसह पूर्ण केले. पुढे नोकरी न मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला. विविध स्पर्धा परीक्षा दिल्या.नवी मुंबई मधील प्रसिद्ध उद्योजक तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते जे.एम.म्हात्रे यांच्या JMM इंफ्रास्ट्रक्टर प्रायवेट लिमिटेड कंपनीत सुपरवायजर तर लोकनेते, माजी खासदार रामशेठ ठाकुर यांच्या TIPL कंपनी मध्ये इंचार्ज असिसटेंट म्हणून त्यांनी काम केले.
शेवटी ते आज नवी मुंबई मधील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये क्लार्कचे काम करतात. तसेच पत्रकारिताही करतात.2013 पासुन ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते रायगड प्रेस क्लबचे सक्रिय सदस्य देखील आहेत. आजपर्यंत विठ्ठल ममताबादे यांनी रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, रोजगार, अन्न वस्त्र निवारा, दळणावळणाच्या सोयी सुविधा,शासन समस्या, प्रकल्पग्रस्तांच्या,बेरोजगारांच्या समस्या, महीलांचे विविध प्रश्न आदि समस्यांना विविध वृत्तपत्रातुन वाचा फोडली आहे.सर्वसामान्य गरीब माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्यांनी आपली पत्रकारिता जोपासली आहे. सर्वच क्षेत्रातील व्यक्तिंना आपलेसे करून त्यांची समस्या प्रभावीपणे,उत्कृष्टरित्या विविध वृत्तपत्रातुन मांडणे हे त्यांच्या लेखनीचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या लेखनीने आजपर्यंत सर्वच क्षेत्रातील व्यक्तिंना,तळागाळापर्यंत न्याय दिला आहे.दैनिक लोकमत, दैनिक सकाळ मध्ये त्यांनी वार्ताहर म्हणून काम केले आहे.सध्या ते दैनिक वादळवारा,दैनिक रामप्रहर मध्ये वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत.सामाजिक जाणीवेतून विविध वृत्तपत्रातुन ते नागरी समस्यांना वाचा फोडतात.लेखक, पोलिसमित्र, सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते सर्व परिचित आहेत.
उरण मधील विविध सामाजिक संघटनेत ते विविध पदावर कार्यरत आहेत.उरण मधील विविध सामाजिक संस्थेतर्फे तसेच सर्वच राजकीय पक्षातर्फे त्यांचा उत्तम पत्रकार म्हणून अनेकवेळा सत्कार झाला आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेवून पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देउन गौरविन्यात आला. तसेच पत्रकार विठ्ठल ममताबादे यांची निवड याच संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली आहे. दरम्यान कार्यक्रम प्रसंगी पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी पत्रकार उत्कर्ष समितीचे आभार मानले. तसेच या सर्वांचे श्रेय पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील संपादक, उपसंपादक, पत्रकार मित्रवर्ग, वृत्तपत्र कार्यालयीन कर्मचारी, उरणची जनता यांना दिले आहे.आपण जे काही आहोत ते यांच्यामुळेच आहोत अशी भावना पत्रकार विठ्ठल ममताबादे यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पंडित तर आभार प्रदर्शन वैभव पाटिल यांनी केले.