नद्या जोडणी प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य
नवी दिल्ली, दि.२४ – देशातील नद्या जोडणी प्रकल्पांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आल्याची माहिती जलस्रोत राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. आवश्यक सर्वेक्षण आणि अभ्यासाअंती राष्ट्रीय जल विकास संस्थेने देशात 30 ठिकाणी अशा जोडण्या शक्य असल्याचे निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रासह देशभरात अशा नद्या जोडणी प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.
महानदी आणि गोदावरी, गोदावरी आणि कृष्णा, कृष्णा आणि पेन्नार या नद्यांच्या जोडणीसंदर्भातील व्यवहार्यता अहवालाचे काम पूर्ण झाले आहे. तर तापी आणि नर्मदा, दमणगंगा आणि पिंजाळ, बेडती आणि वरदा या नद्यांचे सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहणाऱ्या नद्या जोडण्यांसंदर्भातील प्रकल्पांच्या सामंजस्य कराराचा मसुदा संबंधित राज्यांना सहमतीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही मेघवाल यांनी दिली.