प्रेरणादायी उद्योजक विशेषांक
शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरुण
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदीर- राणा प्रताप भवनच्या माजी विद्यार्थी संघाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्त माजी विद्यार्थी संघाच्या ‘संकल्प’ मासिकाच्या उद्योजक विशेषांकाचे प्रकाशन आज (१ मे २०१९) एका कार्यक्रमात झाले.
राणा प्रताप भवन येथे झालेल्या कार्यक्रमात
शाळेचा माजी विद्यार्थी व उद्योजक ओंकार कुलकर्णी यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. राणा प्रताप शाळेतील निवृत्त चित्रकला शिक्षिका कुमुद डोके यांनी प्रास्ताविकात अंकाच्या प्रकाशनामागील भूमिका सांगितली तर ओंकार कुलकर्णी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका भोंडे बाई यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास राणा प्रताप भवनच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भोजराज रायसिंग, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनंदा बेडसे आणि शाळेतील शिक्षक-शिक्षिका, माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद विद्या मंदिराच्या राणा प्रताप व गोपाळनगर शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी उद्योग-व्यवसायातील वेगवेगळ्या वाटा निवडून त्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे अशा काही उद्योजक, व्यावसायिकांचा परिचय या अंकात करून देण्यात आला आहे. यात डॉ. स्मिता दामले-जोशी (कठोर परिश्रमांची केमेस्ट्री) माधवी जोशी (लेखन छंदातून उद्योग), जयंत फडके (उद्योजकता काळाची गरज),
पुष्कर रासम (डोंबिवली ते मढ), अपूर्वा सहस्त्रबुद्धे ( हॅपी ट्रीप्स), संदीप जोशी (महत्त्व सकारात्मक दृष्टिकोनाचं), डॉ. अनंत बेंडाळे (रुग्णसेवेचे संस्कार), डॉ. वंदना लोहार-चिंचणकर (लोखंडाचे सोने करणारा उद्यमी), निकेतन तावडे (चॉकलेटची रुची) यांचा समावेश आहे. तसेच शेखर जोशी (प्रेरणादायी उद्योजक विशेषांक), डॉ. अमृता पटवर्धन (अनुभव), अॅड. आदिती टण्णू (आमची शाळा) यांचेही लेख आहेत. अंकाचे संपादक हेरंब ओक असून मुखपृष्ठ विराज साने यांचे आहे. उद्योजक विशेषांकाच्या आधी कला त्रिवेणी विशेषांक प्रकाशित झाला होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपुढे ठेवणे ही या संकल्प विशेषांकाची कल्पना आहे. अंकाचे स्वागत मूल्य पन्नास रुपये असून हा अंक प्रकाश केसकर ( अक्षय जनरल स्टोअर्स, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, राणा प्रताप भवन, पं. दिनदयाळ उपाध्याय छेद मार्ग, विष्णुनगर, डोंबिवली-पश्चिम) किंवा मयुरेश गद्रे (गद्रे बंधू स्टोअर्स, फडके रस्ता, डोंबिवली-पूर्व) येथे मिळू शकेल.