ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या नुतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
कामाच्या गुणवत्तेची मुंबई आयआयटी तपासणी करणार
ठाणे, दि. २४
ठाणे महापालिका क्षेत्रात २८४ रस्त्यांच्या नुतनीकरणाची कामे सुरू असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच या कामाची पाहाणी केली. या दौऱ्यादरम्यान कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी मुंबई आयआयटीच्या पथकाने रस्त्यांचे नमुने घेतले आहेत.
गुणवत्ता तपासणीसाठी डांबर आणि काँक्रीट अशा दोन्ही रस्त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. कोणत्याही रस्त्यांचे काम करताना विशिष्ट मातीचा थर त्यावर खडी आणि नंतर त्यावर डांबराचे थर चढवले जातात. हा थराची जाडी योग्य आहे का, याचे मोजमाप मोजपट्टीच्या सहाय्याने केले जाते. तसेच हा थर बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तू दर्जेदार आहेत की नाही याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे गुणवत्तापुर्ण व्हावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे आग्रही असून त्यासाठी त्यांनी कामांची गुणवत्ता तपासणीचे निर्देश पालिकेला दिले होते. यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्ते कामांची गुणवत्ता तपासणीसाठी मुंबई आयआयटी पथकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता.