मोबिलाईज युवर सिटी’ करारावर भारत आणि फ्रान्सच्या स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली, – भारत आणि फ्रान्सतर्फे नवी दिल्लीत ‘मोबिलाईज युवर सिटी’ या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झिग्लेर यांच्या उपस्थितीत मंत्रालयाचे विशेष अधिकारी तसेच माजी कार्यान्वय संयुक्त सचिव मुकुंद कुमार सिन्हा आणि फान्सच्या प्रगतीक विकासाचे क्षेत्रीय संचालक निकोलस फोर्नेज यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
‘मोबिलाईज युवर सिटी’ उपक्रमांतर्गत नागपूर, कोची आणि अहमदाबाद या शहरांची पथदर्शी प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर परिवहनाशी संबंधित सुधारणा केल्या जाणार आहेत. भारतासाठी देश स्तरावर शाश्वत परिवहन धोरणात सुधारणा करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
गृहनिर्माण आणि शहर व्यवहार मंत्रालय तसेच एजन्सी फ्रान्स डेव्हलपमेंटतर्फे प्रकल्पाशी संबंधित कामे निश्चित केली जाणार असून त्यानुसार निवडलेल्या तिन्ही शहरांमध्ये अंमलबजावणी केली जाईल.