तपासाच्या बहाण्याने पीडित तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकाचा बलात्कार
ठाणे – जिल्ह्यात पोलीस वर्दीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीवर प्रियकरासह एका नराधमाने काही महिन्यापूर्वी बलात्कार केला होता. त्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकानेही पीडित तरुणीवर तपास करण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची घटना घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून त्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. रोहन गोंजारी असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. रोहन शांतीनगर पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीमुसार, पीडित तरुणी मुंबईतील कफपरेड भागात राहणारी आहे. तिची काकू भिवंडीच्या गायत्रीनगर परिसरात राहते. मुंबईवरून ती काकूच्या घरी सुट्टीच्या दिवशी भेटायला यायची. नेहमीप्रमाणे ऑगस्ट २०१५ला ती भिवंडीत आली होती. त्यावेळी तिच्या मोबाईलचा रिचार्ज संपल्याने ती त्याच परिसरात एका मोबाईलच्या दुकानात रिचार्ज करण्यासाठी गेली असता तिची ओळख आरोपी सतिशसोबत झाली. त्यावेळी आरोपीने ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फिरण्याचा बहाणा करत तिला लॉजवर नेले. मात्र, प्रियकराचे लग्न झाले असून त्याला २ मुले असल्याचे समजल्यावर तिने प्रेमसंबंधास नकार दिला. मात्र, तरीही त्याने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचारातून पीडिता दीड महिन्याची गरोदर राहील्याने तिने प्रियकर सतीशला या घटनेची माहिती दिली. त्यावर त्याने पुन्हा प्रेमाचे नाटक करून तिला गर्भपात होण्यासाठी गोळ्या दिल्या होत्या. असे प्रकार २०१५ ते जून २०१८ पर्यंत वांरवार होणाऱ्या अत्याचारामुळे आणखी २ वेळा तिचा आरोपी प्रियकराने गर्भपात केला.
दरम्यानच्या काळात आरोपी सतीश याच्या पहिली प्रेयसी राबिया हिला दोघाचे प्रेमसंबधाची कुणकुण लागल्याने तिने पीडित तरुणीला फोन करून आपले व सतीशचे प्रेमसंबध आधीपासून आहेत. यामुळे तू त्याचा पिच्छा सोड, असे सांगत तिच्याशी वाद घातला. तरीही पीडित तरुणी आपल्या प्रियकराशी शारीरिक संबध ठेवत असल्याचे तिला समजले. राबिया पीडित तरुणीला बहाणा करून तिच्या घरी बुरखा घालून घेवून गेली. घरी जाताच तिने पीडितेला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर नराधम सलीम करवी बलात्कार होतानाचा आरोपी राबिया हिने मोबाईलमध्ये चित्रीकरण करून व्हिडिओ तयार केला होता. दुसऱ्या दिवशी आरोपी राबियाने हा व्हिडिओ पीडित तरुणीला दाखवला. त्यावेळी तिला धक्काच बसला. त्यावेळी पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ५० हजार रुपयाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे पीडितेने ४३ हजार रुपये दिले. तरीही तिला धमकी देण्याचा प्रकार सुरू असल्याने आपली समाजात बदनामी होईल या भीतीने खडवली नदीत आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल तिने उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिच्या एका मैत्रीणीने तिला आत्महत्या करण्यास रोखले. या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून कुलाबा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावर कुलाबा पोलिसांनी गुन्हा भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवून बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. या गुन्ह्याच्या आधारे पोलिसांनी तिघाही आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
हे ही वाचा …
लग्न झाले असतानाही तरुणीची फसवणूक करणाऱ्या तरुणावर गुन्हा – डोंबिवलीतील घटना
मात्र, पूर्वीच्या अत्याचाराच्या घटनाक्रमाला खुद्द पीडित तरुणीने कलाटणी दिली. तिच्या माहितीनुसार सतीश माझा प्रियकर असून आमच्या दोघांच्या समंतीने आमचे शारीरिक संबध आहेत. यामुळे प्रियकर सतीशवरील अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी तिने पोलिसाकडे तगादा लावला होता. मात्र, या गुन्हातील तिन्ही आरोपींना त्यावेळी शांतीनगर पोलिसांनी अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली होती. पीडित तरुणीच्या माहितीनुसार तिने न्यायालयासमोरही प्रियकर सतीशने अत्याचार केला नसून आमच्या संमतीने शारीरिक संबध ठेवल्याचे नमूद केले. मात्र, त्याच गुन्ह्यातील तपास अधिकारी गोंजारी हे पीडित तरुणीला खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कारवाई करण्याची धमकी देत होते. तसेच तुझ्या प्रियकराला यातून सोडवतो तू माझ्यासोबत शाररीक संबध ठेव, असे बोलून तिला ब्लॅकमेल करीत असल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक गोंजारी यांनी १६ ऑगस्ट २०१८ ला रात्रीच्या ९ च्या सुमाराला पिडित तरुणीला राजनोली नाक्यावर बोलवले. त्यानंतर कल्याण रेल्वे स्टेशन समोरील एका लॉजवर नेऊन गोंजारी यांनी तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गोंजारी याने पिडित तरुणीकडून एका कागदावर लिहून घेतले होते, कि माझ्या सहखुशीने मी पोलीस उपनिरीक्षक गोंजारी यांच्या सोबत शारीरिक संबध ठेवत आहेत. असे लिहून त्यावर सही केल्याचे पिडित तरुणीने कोनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या जबानीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनायक देशमुख करत आहेत.