तर ‘हनुमान चालिसा’ ठरला असता फुसका बार!
तर ‘हनुमान चालिसा’ ठरला असता फुसका बार!
राणा दाम्पत्याचे ‘मातोश्री’वर स्वागत आहे. तुम्ही या आणि हनुमान चालिसा किंवा आणखीन काही म्हणायचे असेल तर म्हणा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच सांगितले असते तर राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा म्हणण्याचा बार फुसका ठरला असता. त्यांच्या हनुमान चालिसा म्हणण्याच्या आव्हानातील हवा पूर्ण निघाली असती आणि उद्धव ठाकरे मोठे झाले असते.
बरं तर बरं राणा दाम्पत्य ‘मातोश्री’त घुसून हनुमान चालिसा म्हणणार नव्हते. ‘मातोश्री’समोर पदपथावर उभे राहून त्यांनी हनुमान चालिसा म्हटला असता तर आकाश कोसळले असते? ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा म्हटला तर भावना दुखवायला ‘मातोश्री’ आता ‘मशिद’ झाली आहे का?
उलट उद्धव ठाकरे यांनी या हनुमान चालिसा म्हणण्याचा पराचा कावळा केला नसता आणि अगदी मी म्हणेन की त्या ही पुढे जाऊन उद्धव यांनी मुद्दामहून राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा म्हणण्यासाठी अगदी पायघड्या अंथरल्या असत्या तर राणा दाम्पत्याचा हनुमान चालिसा म्हणण्याचा बार फुसका ठरला असता. पण उद्धव ठाकरे यांच्या बदसल्लागारांनी त्यांना नेहमीप्रमाणेच बदसल्ला दिला आणि त्यांनी तो ऐकला.
काहीही कारण नसताना नाहक वाद निर्माण होऊन राणा दाम्पत्याला प्रसिद्धी मिळतेय. अभिनेत्री कंगना प्रकरणीही शिवसेना तेव्हा तोंडावर आपटली होती. कंगनाच्या वक्तव्याकडे दूर्लक्षच केले असते, तिला अनुल्लेखाने मारले असते तर? संजय राऊत यांनी ‘सामना’ तून जे काही लिहिले, वादग्रस्त वक्तव्य केली त्यामुळे शिवसेनेचेच हसे झाले. राणा दाम्पत्याच्या बाबतीतही आता तेच होत आहे. तुम्हीच त्यांना नाहक मोठे करताय.
कधी तरी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते आणि दोन पावले मागे आल्याने काही अपमान वगैरे होत नसतो. समोरच्याला अशा प्रकारेही गारद करता येते. हा ही राजकारणाचाच भाग आहे, हे कधी कळणार?
उद्धव साहेब तुमचे बदसल्लागार खरोखरच बदला.
शेखर जोशी यांंचा फेसबुुक वॉॉल वरून साभार