पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत- पंकजा मुंडे
मुंबई, दि. ७
गेल्या २० वर्षांपासून मी राजकारणात असून माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. त्याचे समर्थन करणेही मला जमत नाही, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले.
सध्या जे राजकारण सुरु आहे त्याचा वीट आला असून वेळप्रसंगी राजकारणातून बाहेर पडायलाही मी मागेपुढे पाहणार नाही. आता एक-दोन महिने सुट्टी घेऊन अंतर्मुख होऊन विचार करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
२०१९ मध्ये माझा पराभव झाला तेव्हापासून मी पक्ष सोडेल अशा चर्चा सुरु होत्या. चार वर्षांपासून त्या सुरुच आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नाही. भागवत कराडांना राज्यसभा, रमेश कराडांना विधान परिषद मिळाली. त्यानंतरही अनेक विधान परिषद झाल्या. त्यामुळे माझे कार्यकर्ते माझ्या नावाची चर्चा करतात.
विधान परिषदेसाठी अर्ज भरा असे मला दोन वेळा मला सांगितले आणि दहा मिनिटे आधी अर्ज भरु नका, असे सांगितले गेले. हे कोण करताय ते माहिती नाही, असे मुंडे यांनी सांगितले.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची मी भेट घेतल्याची बातमी चुकीची आहे. एखाद्याची विश्वासार्हता आणि करिअर संपवण्याचा हा प्रकार आहे. माझे करिअर कवडीमोलाचे नाही.
भाजपच्या १०६ आमदारांच्या मनात काही गोष्टी असतील पण बोलण्याची हिंमत नाही. माझ्या पक्षाला माझ्याबद्दल सन्मान असेल अशी माझी अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या.
——-