मी आणि जयंत पाटील बाजूला होतो, तुम्ही परत या – जितेंद्र आव्हाड यांचे अजित पवार गटाला आवाहन
शरद पवार यांना या वयात त्रास देऊ नका, मी आणि जयंत पाटील बाजूला होतो, आम्ही राजकारणात दिसणार नाही, तुम्ही परत या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज अजित पवार गटाला केले.
येवला येथील जाहीर सभेला जाताना सकाळी पवार यांचे ठाणे येथे आगमन झाले. नाशिकच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत केले. त्यावेळी आव्हाड बोलत होते.
आमच्या सारख्या लोकांनी शरद पवार यांना घेरले असे अजित पवार यांना वाटते. ते म्हणत असतील आम्ही अवतीभोवती आहोत म्हणून त्रास होतो, तर आम्ही बाजूला होतो, असे आव्हाड म्हणाले.
दरम्यान असेच आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना केले आहे. माझ्यामुळे तुम्ही बाहेर पडला असाल तर मी दूर होतो, तुम्ही परत उबाठा गटात या,असे राऊत यांनी सांगितले.
—-