पतीचे परस्त्रीशी प्रेम संबध ठरले जिवघेणे, पत्नीचा मृत्यू तर, दोन मुली गंभीर

पतीचे परस्त्रीशी असलेल्या प्रेम संबंधाना विरोध करणाऱ्या पत्नीसह, दोन मुलींना घराला आग लावून जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून दोन मुली गंभीर रित्या होरपळल्या आहेत.

ही घटना कल्याण तालुक्यातील भोपर गावात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पती विरोधात मृत महिलेच्या भावाने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रसाद पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तर प्रीती (वय ३५) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव असून; समीरा (१४), समीक्षा (११) या मुली गंभीर भाजल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या वाशी सरेभाग येथील रहिवासी असलेल्या मृत प्रीती हिचा विवाह २००७ मध्ये भोपर गावातील प्रसाद पाटील याच्याशी पार पडला होता. त्यांना विवाहनंतर दोन मुली झाल्या आहेत. त्यातच आरोपी पती प्रसादचे एका परस्त्रीशी प्रेम संबंध असल्याचे पत्नीच्या निर्दशनास आल्याने तिने पतीला समजविण्याचा प्रयत्न केला.

मात्र तो ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. त्यानंतर तो पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊ लागला. तर मुलींना नियमित मारझोड करू लागला, असे मृतक प्रीतीचा भाऊ किशोर पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रारीत नमूद केले आहे.

आरोपी प्रसाद याने सुखाने संसार करावा म्हणून त्याला वेळोवेळी समजविण्यात आले. गेल्या आठ दिवसापूर्वी प्रीतीच्या माहेरच्या मंडळींनी भोपर येथे येऊन प्रसादची समजूत घालून त्यांना सुखाने राहण्याचे समजावले होते.

परंतु यावेळी प्रसाद याने प्रीतीच्या माहेरहून आलेल्या मंडळींना धमकावले होते. तुम्ही या भानगडीत पडू नका असा इशारा दिला होता. माहेरच्यांना खोट्या गुन्हयात अडकविण्याची धमकी दिली होती. तर मृत प्रीती आणि तिच्या दोन्ही मुलींनी प्रसाद पासून आपल्या जीवाला धोका असल्याचे माहेरच्या लोकांना सांगितले होते.

अनेक वेळा प्रसाद चार पाच दिवस घरी येत नाही असे प्रीती सांगत होती, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात अंतीम तडजोड करण्यासाठी किशोर पाटील आणि प्रसाद यांनी ठरविले होते. त्यावेळी प्रसादने आता नवरात्र चालू आहे, त्यानंतर आपण भेटू असे किशोर यांना सांगितले.

ही संधी साधत आरोपी पतीने शनिवारी सकाळच्या सुमारास स्वतःच्या घराला आग लावून पत्नी प्रीती, तिच्या दोन मुलींना जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, असेही पोलीस ठाण्यातील तक्रारीत नमूद केले आहे. खळबळजनक बाब म्हणजे प्रसाद याच्या घराला शनिवारी सकाळी साडे सहा वाजता आग लागल्यानंतर पोलिसांना ही माहिती सकाळी आठ वाजता देण्यात आली होती.

त्यावेळीच पोलिसांनी या घटनेबद्दल संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी शनिवारी रात्री पती प्रसाद विरोधात पत्नीला जिवंत जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन; प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.