कल्याणमध्ये गॅस सिलेंडर स्फोटात मानवीवस्ती थोडक्यात बचावली

{श्रीराम कांदु}

डोंबिवली दि.०७ :- कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या पिसवली गावातील बैठी चाळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावली. या चाळीतील एका घरात घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. मात्र दाटीवाटीच्या वस्तीत जाण्यास फायर ब्रिगेडला अडथळा निर्माण झाल्याने अशा वस्त्या धोक्याच्या उंबरठ्यावर येऊन उभ्या ठाकल्या असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. पिसवलीतील चेतना शाळेजवळ असलेल्या श्री कॉलनी चाळ क्र. 3 मधील खोली क्र. 6 मध्ये लक्ष्मी साहू या कुटुंबियांसह राहतात. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्या स्वयंपाक करत होत्या.

हेही वाचा :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये पत्रकार दिवस साजरा

इतक्यात सिलेंडर संपल्याने त्यांनी दुसरा सिलेंडर लावला. मात्र हा सिलेंडर लिकेज असल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या गॅसने आग लागली. ही आग हाहा म्हणता मोठ्या प्रमाणात पसरली. त्यातच सिलेंडरचा स्पोट होऊन आग आणखी भडकली. या आगीची झळ चाळीतील अन्य 3 घरांनाही पोहोचली. त्यामुळे या आगीत तिन्ही घरांचे अतोनात नुकसान झाले. फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. मात्र घटनास्थळी पोचण्यात फायर ब्रिगेडच्या जवानांना बंबांसह पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे हे जवान पायी पोहोचले. तोपर्यंत चाळीतील रहिवाश्यांनी ओले गोणपाट टाकून सिलेंडरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. फायर ब्रिगेडच्या जवानांनी मात्र सदर सिलेंडरला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

हेही वाचा :- लोकग्राम रेल्वेवरील नविन पादचारी पुल बांधण्यासाठी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जागेची निश्चिती

विशेष म्हणजे गेल्या कित्येक दिवसांपासून तेथील रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वेळेत फायर ब्रिगेडचे बंब पोहचु शकली नाहीत. या आगीत घरमालक किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली नाही. परंतु फायर ब्रिगेड उशीरा पोहोचल्याने घरांचे फार मोठे नुकसान झाल्याचे रहिवाश्यांनी सांगितले. आज सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. परंतु मनपा प्रशासन काही दुर्दैवी घटनेची वाट बघते का ? कारण सदर परिसरात जाणारा रस्ता आर्थिक तरतुद व मंजुर असताना खुप संथगतीने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केला.

Leave a Reply

Your email address will not be published.