तृतियपंथीयाचा निर्घृण खून, मारेकऱ्या प्रियकाराला काही तासांतच बेड्या

कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका किन्नरची निर्घुण हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या काटेमानिवली परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सुशील भालेराव या तरूणाविरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत. धीरज विवेक साळवे उर्फ रेवा देसाई असे मृत तृतियपंथीयाचे नाव असून सुशील भालेराव याचे तृतियपंथीयावर प्रेम होते. मात्र संशयातून त्याने रेवाची हत्या केल्याचा पोलिसांचा कयास आहे.
          कल्याण पूर्वेकडील काटेमानवली परिसरात असलेल्या आंबेडकर चौकातील शिवसह्याद्री कॉलनी येथे भाड्याच्या घरात राहणारा धीरज साळवी उर्फ रेवा देसाई हा तृतीयपंथीय असून त्याच्यावर सुशील भालेराव या तरुणाचे प्रेम होते. या प्रेमप्रकरणातून सुशील त्याच्यावर संशय घेत असे. रेवा याला सुशील नेहमी मारहाण करत होता. तीन दिवसांपासून रेवा याच्या घराच्या दाराला कुलूप होते. मात्र सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने या घराच्या मालकीणीची मुलगी भाग्यश्री हंजनकर हिने रेवा याला बाहेरून आवाज दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरात डोकावून पाहिले. रेवा हा बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या मुलीने तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर रेवाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविला. धारदार शस्त्राने रेवा याच्या शरीरावर असंख्य वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. मृतदेह कुजल्याने दोन दिवसांपूर्वी रेवाची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. रेवाची मैत्रीण अर्चना केणे हिने रेवाच्या भावाला धक्कादायक माहिती दिली. हा फोन रेवाने 16 मे रोजी केला होता. माझी तब्येत बरी नसून सुशील माझ्याकडे आला आहे, संशय घेवून तो मला मारहाण करत असल्याचे रेवाने फोनवर सांगितले होते. याबाबत रेवाच्या भावाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सुशील भालेराव विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला. अखेर मंगळवारी सकाळी पोलिसांनी रेवाचा खूनी सुशील याला बेड्या ठोकल्या. बुधवारी या खुन्याला कल्याण कोर्टासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email