नमस्कार, आजच्या ठळक बातम्या

 

कोणा एकाच्या घरी असलेला दूरदर्शन संच, छायागीत, चित्रहार, गजरा, मराठी/हिंदी चित्रपट आणि अन्य कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांच्या घरात होणारी गर्दी आणि तेव्हाच्या आठवणी आत्ता जे ४५- ५५ या वयातील आहेत.

त्या पिढीच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. यात एक लोकप्रिय कार्यक्रम होता ‘बातम्या’.

‘सातच्या आत घरात’, नंतर शुभंकरोती, परवचा आणि एकमात्र असलेल्या (रात्री दहा- साडेदहानंतर प्रक्षेपण बंद होणा-या) मुंबई दूरदर्शन केंद्रावरील साडेसात वाजता सादर होणा-या बातम्या ऐकणे/पाहणे हा घराघरातील कार्यक्रम असायचा. मुंबई दूरदर्शनच्या अन्य कार्यक्रमांप्रमाणेच या बातम्याही लोकप्रिय होत्या.

संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई दूरदर्शन केंद्रावरील बातम्यांची ती विशिष्ट ‘टय़ुन’ सुरू झाली की आज बातम्या द्यायला कोण येणार याची घराघरातील मुले, मोठी माणसे यांच्यात जणू स्पर्धा लागायची. भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किर्पेकर, चारुशीला पटवर्धन, अनंत भावे की.. अशी नावे घेतली जायची आणि आपण सांगितलेले नाव बरोबर आले की जणू काही जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. यात एक नाव असायचे सुहास्य, प्रसन्न मुद्रेचे आणि भारदस्त आवाजाचे प्रदीप भिडे यांचे…

मुंबई दूरदर्शनच्या बातम्यांचा चेहरा, भारदस्त आवाजाचा आणि वृत्तनिवेदन, सूत्रसंचालनातील हुकमी एक्का. नमस्कार, आजच्या ठळक बातम्या….असा आवाज कानावर पडला की पुढची पंधरा मिनिटे हा आवाज प्रेक्षकांना, श्रोत्यांना एका जागी खिळवून ठेवायचा. मंत्रमुग्ध करायचा. कोणताही आक्रस्ताळेपणा, आरडाओरड न करता बातमी कशी वाचायची, कशी सादर करायची याचा प्रदीप भिडे हे आदर्श होते. प्रसन्न आणि हसरे व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चार हे त्यांच्या वृत्तनिवेदनाचे वैशिष्ठ्य होते. समोरच्याला काही क्षणात आपलेसे करण्याचा त्यांचा स्वभाव होता.

त्या काळात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून ती सोडण्याचे धाडस त्यांनी दाखवले. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतूनही काही काळ ते नाटकांशी जोडले गेले होते.

गेली काही वर्षे ते आजारीच होते. चार वर्षांपूर्वी लोकसत्ता- रविवार वृत्तान्तमधील ‘पुनर्भेट’ या माझ्या सदरासाठी त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. ते तेव्हा घरातल्या घरात व्यवस्थित हिंडते- फिरते होते.

अधूनमधून त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डिंग स्टुडिओतही जात होते. चालण्या-बोलण्यात थोडासा थकवा किंवा हळूपणा दिसत असला तरी बोलण्यातील उत्साह, शैली आणि आवाजातील भारदस्तपणा कायम होता. मुलाखत झाल्यावर मोबाईलमध्ये तुमचा फोटो काढू का? विचारल्यावर त्यांनी, हल्ली मी आजारी असतो. त्यामुळे चांगला दिसेन असा फोटो काढ, असे हसत हसत सांगितले आणि फोटो काढण्यासाठी कोणतेही आढेवेढे न घेता अगदी सहज तयार झाले. या लेखात तो फोटो व त्यांच्याबरोबर काढलेला सेल्फी आहे.

बातम्या, जाहिराती, माहितीपट, लघुपट आणि कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक मनात आणि कानात घर करून राहिलेले प्रदीप भिडे आज शरीराने आपल्यात नसले तरीही त्यांच्या भारदस्त आवाजाच्या रुपाने ते आपल्या चिरकाल स्मरणात राहणार आहेत.
प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

Leave a Reply

Your email address will not be published.