डोंबिवलीत वीज मीटर बायपास करून जीम चालकाने केली ९ लाखांची वीजचोरी, गुन्हा दाखल

 

कल्याण पूर्व विभागातील नांदिवली शाखेंतर्गत देसलेपाडा येथे ‘डी फिटनेस क्लब’ च्या जीम चालकाने मीटर बायपास करून तब्बल ९ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणले आहे.

याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जीमच्या जागेचा मालक व चालकाविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रघु पुजारी (चालक) व हेमंत पाटील (मालक) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. देसलेपाड्यातील वरद विनायक रेसिडेन्सीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘डी फिटनेस क्लब’ या जीमच्या वीजपुरवठ्याची तपासणी महावितरणच्या पथकाने केली. मीटरकडे येणाऱ्या केबलला लाकडी फळीच्या आतून दुसरी केबल जोडून जीमसाठी परस्पर वीजवापर सुरू असल्याचे पथकाच्या तपासणीत आढळून आले.

गेल्या १४ महिन्यात जीमसाठी ९ लाख ६ हजार २२० रुपयांची ४७ हजार १५८ युनिट वीज चोरण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात पुजारी आणि पाटील यांच्याविरुद्ध वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व विभागांतर्गत एप्रिल २०२२ पासून ३३ लाख ६१ हजार रुपयांच्या ७१ वीजचोऱ्या उघडकीस आणण्यात आल्या आहेत. यात हेमंत दरे आणि सुरेश शेट्टी यांच्या अनुक्रमे २ लाख ४० हजार व ८४ हजार रुपयांच्या वीजचोरीचा समावेश आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.