भाजपाच्या दोन पिढ्या, भाजपा नेते सुनिल देवधर आणि ज्येष्ठ भाजपा नेते अनिल भदे यांची सदिच्छा भेट

भाजपाच्या दोन पिढ्या

भाजपा नेते सुनिल देवधर यांच्या समवेत ज्येष्ठ भाजपा नेते अनिल भदे दिसत आहेत.

अनिल भदे यांचे वडील खर्डी येथे जनसंघाचे सरपंच होते. भदे कुटूंब रा.स्व.संघाचे. खर्डी, शहापूर, डोंबिवली आणि आता ठाणे असा भदे कुटुंबाचा प्रवास.

अनिल भदे वयाच्या अकराव्या वर्षी शहापूर आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी डोंबिवली येथे असताना रा.स्व.संघाशी घट्ट मैत्री झाली. भागशाळा मैदानाच्या शाखेतून अनिल भदे यांनी पश्चिमेला संघ काम रुजविण्यासाठी योगदान दिले.

श्रीगुरूजी यांचा अनिल भदे यांच्यावर विशेष प्रभाव होता. गुरुजी यांच्या निधनाने व्याकुळ झालेल्या अनिल भदे यांनी आवडीचे श्रीखंड खाणे सोडून दिले होते. बहुदा गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेला श्रीखंड खाणे सुरू केले. डोंबिवलीत अनिल भदे यांनी खूप मित्र जमा केले. ते घराशी, कुटुंबाशी जोडले गेले.

यशावकाश भाजयुमोत अनिल भदे सक्रिय झाले. भाजयुमोचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले. रामभाऊ म्हाळगी यांची शिकवण आणि मार्गदर्शन मिळाले. दिवंगत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी गट्टी जमली होती.

भाजयुमोच्या माध्यमातून डोंबिवलीत भाजपा विचार प्रसारासाठी अनिल भदे यांनी धडाडीने काम केले. अन्य सार्वजनिक, सांस्कृतिक कामात सक्रिय असलेल्या अनिल भदे यांना कल्याण-डोंबिवली महापालिका निर्मिती नंतर झालेल्या पहिल्या निवडणूकीत पक्षाने उमेदवारी दिली.

अनिल भदे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. वार्डात विविध कामे करून लोकप्रिय झाले. डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रा उपक्रमात सक्रिय होते. पुढिल निवडणूकीत प्रभाग रचना बदलल्याने निवडणूक लढवली नाही. राजकीय सक्रियता राहिली.

कालांतराने नोकरी निमित्त ठाणे निवासी झाले. ठाण्यात पुन्हा सक्रिय झाले. माजीवडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष असलेले अनिल भदे भाजपा ठाणे जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ता मंचाचे नेतृत्व करत आहेत. वाचन, कलांचा आस्वाद, प्रशासनाशी संपर्क, प्रवास यातून माणसं जोडत आहेत.

अनिल भदे यांच्या सारखे अनेकांनी जनसंघाची पणती घेऊन काम सुरू केले आणि त्यातून कमळ फुलवले आहे. असे कितीतरी अनिल भदे अज्ञात आहेत.अनाम आहेत. सुनिल देवधर त्या पिढीला आज ठाणे येथे भेटले आहेत.

शिक्षक, संघ प्रचारक, माय होम इंडियाचे प्रवर्तक आणि आता भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनिल देवधर यांचे अनिल भदे यांच्या सारख्याना आवर्जून भेटणे महत्वाचे आहे.संदेश देणारे आहे. भाजपाच्या माध्यमातून राजकीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हा संदेश आहे.

पूर्वीचा ठाणे जिल्हा आणि आताचा ठाणे-पालघर जिल्हा शहरी, निमशहरी, ग्रामीण, वन आणि डोंगरी क्षेत्राचा. काँग्रेस, डावे, आणि समाजवादी अश्या काहीश्या वातावरणाचा.

यात साधारण 1930-35 नंतर हिंदू विचारांची पुनर्स्थापना सुरू झाली. समाज प्रतिक्षेत होता. कार्यकर्ते पोहचत होते. स्वागत होत गेले.

“क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही” असा निर्धार करून कार्यकर्ते परिश्रम घेत होते. त्यातून या भागात संघटना, संस्था यांचे जाळे विणले गेले. राजकीय दृष्ट्या जनसंघ स्थिरावला आणि भाजपा विस्तारत गेला.

त्या विस्तारात अनिल भदे यांच्यासारख्यांचा सहभाग महत्वपूर्ण आहे. सुनिल देवधर आज अश्या एका विस्तारकाला भेटले आहेत.

यानिमित्त ठाणे-पालघर भाजपाच्या नेतृत्वाने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या फळीतील अश्या नेत्यांना प्रकाशात आणले पाहिजे. ‘अंधेरा छटेगा, कमल खिलेगा’ यासाठी पणती तेवत ठेवणाऱ्यांची माहिती नव्या पिढीला देणे उपयोगी आहे.

वरिष्ठ पत्रकार मकरंद मुले यांच्या फेसबुक वाल वरून साभर 

Leave a Reply

Your email address will not be published.