‘दूध देणारा बकरा’; बकऱ्याला पाहण्यासाठी गर्दी

चंद्रपूरच्या राजुरा शहरात मौलाना अबुल कलाम आझाद चौकात राहणाऱ्या अब्दुल शेख यांच्या घरी नागरिकांची गर्दी होत आहे. शेळी-बकरी पालनाची आवड असलेल्या शेख यांच्या घरी एक भला थोरला बकरा उत्सुकतेचा विषय ठरला आहे. एरवी खवय्ये मांसाहारी लोक जिभेच्या चोचल्यांसाठी बकऱ्याचा शोध घेत असतात. मात्र शेख यांच्या घरचा बकरा प्रसिद्ध झाला आहे तो दूध देण्यासाठी. काही दिवसांपूर्वी शेख यांनी उपचार करण्यासाठी आपल्या बकऱ्याला राजुरा येथील पशुवैद्यक रुग्णालयात नेले  होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी करताना हा दूध देऊ शकेल अशी शंका व्यक्त केली होती. त्यानंतर खरंच काही दिवसांनी बकरा दूध देऊ लागला. इतका की दूध काढले नाहीतर जमिनीवर ओघळू लागले. शेवटी त्याच्या वेदना कमी करण्यासाठी शेख यांनी त्याचे रोज दूध काढणे सुरु केले.

बघता बघता ही वार्ता परिसरात पसरली आणि बघ्यांची रीघ सुरु झाली.  हा प्रकार शक्य आहे अशी प्रतिक्रिया पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही अवयव पूर्णपणे विकसित होण्याची प्रक्रिया रखडली, दोष निर्माण झाले की असे घडते त्यात विशेष काही नाही असे तज्ज्ञाचे मत आहे. या दुधाळू बकऱ्याचा आधीच इतिहास कसा आहे, त्यांचे संपूर्ण निरीक्षण केल्यावर ठोस निष्कर्ष काढता येतील अशी प्रतिक्रिया पुढे आली आहे. जगातील कोणतेही महाकठीण काम करायचे असल्यास त्याला ‘बकरा दूध देणे’ असा बोली-ग्रामीण भाषेतील वाक्यप्रचार सर्रास वापरला जातो. मात्र या वाक्यात आता फारसा अर्थ राहिलेला नाही. हे राजुरा येथील उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. गंमत वेगळी, कारण काहीही असो चंद्रपूरचा हा दुधाळू बकरा मात्र चांगलाच भाव खातो आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.