डोंबिवलीतील रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे द्या ..
डोंबिवली दि. ०१- स्मार्ट सिटीत वाहतुकीला जास्त महत्व दिले आहे. कल्याण-डोंबिवली शहर स्मार्ट सिटीत आली असली तरी या शहरातील वाहतुकीचे बारा वाजले आहेत. बेशिस्त रिक्षाचालकांनी शहरातील वाहतूक व्यवस्था बिघडवली असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाहतूक निरीक्षक एस.एन. जाधव यांना जाब विचारत डोंबिवलीतील रिक्षाचालकांना शिस्तीचे धडे द्या असे निवेदन दिले आहे. महिनाभरात स्टेशनबाहेरील अनधिकृतपणे रिक्षा उभ्या करून प्रवाश्यांना त्रास देणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा आणि ज्या प्रमाणे स्टेशनपरिसर फेरीवाला मुक्त केला त्याप्रमाणे अनधिकृत रिक्षा थांबे हटवा अशीमागणी यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने केली.
हेही वाचा :- डोंबिवली ; खंडणीखोर भावडांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल
मनसेचे वाहतूक पोलिसांना निवेदन
या प्रसंगी जिल्हा संघटक राहुल कामत, उप शहर अध्यक्ष राजू पाटील, शहर सचिव अरुण जांभळे, भाग्येश इनामदार, केतन सावंत, संकेत तांबे, हेमंत दाभोळकर, सुमेधा थत्ते, स्मिता भणगे, तसेच सर्व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्याकरीता निवेदन दिल्यानंतर वाहतूक निरीक्षक जाधव आणि मनसेच्या पदाधीकारी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. याबाबत राहुल कामत यांना विचारले असता ते म्हणाले, फेरीवाल्यांना एक नियम आणि रिक्षाचालकांना दुसरा नियम हे कसे शक्य आहे. स्टेशनबाहेरील परिसरात काही बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालक नियमांची पायमल्ली करत आहेत. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष दिल्यास प्रवाश्यांना स्टेशनबाहेर येताना आणि जाताना त्रास होणार नाही. पालिका प्रशासन जर आपले कामचोख बजावत असेल तर वाहतूक पोलीस का आपले काम व्यवस्थित करत नाही ? यावर वाहतूक निरीक्षक जाधव यांनी डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन समोरील बेशिस्त रिक्षा चालकांवर त्वरित कारवाई करू असे आश्वासन ग्वामनसेच्या शिष्टमंडळाला दिले.