पाण्यासाठी ग्रामस्थ घालतात आडाला गराडा; तोल जाऊन पडून मुलीचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

जालना दि.१२ – तालुक्यातील डुकरी पिंप्री येथील गायत्री उगले ही मुलगी देवपूजेला पाणी भरण्यासाठी आडावर गेली होती. विहिरीत पाणी कमी होते. म्हणून तिने बकेट अजून खाली जावी म्हणून थोडी पुढे सरकली. परंतु, याच प्रसंगी ती पाय घसरून विहिरीत पडली. आडात खडक असल्यामुळे तिच्या मांडीचे हाड मोडून ती गंभीर जखमी झाली. यानंतर ग्रामस्थांनी आत उतरून तिला वेळीच बाहेर काढून जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले. परंतु, तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला औरंगाबाद येथे उपचारासाठी हलवण्यात आले. तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचे त्या मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले. ग्रामपंचायतकडून दोन टँकर सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, बीडीओंच्या लेखी आदेशानुसार पीरकल्याण प्रकल्पातून टँकर सुरू करण्यात आले आहेत.

तालुक्यातील पीरकल्याण मध्यम प्रकल्पातून डुकरी पिंपरी गावातील चार हजार लोकांसाठी दोन टॅँकरने २४ हजार लिटर पाणी येते. टँकरने आडात पाणी टाकल्यानंतर पाणी भरण्यासाठी आडाला एकच गराडा पडतो. हा आड जमिनीला लागून आहे. आडाला कठडे नसतानाही महिला, पुरुषांसह, तरुण, तरुणींना जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागते. दरम्यान, पाचव्या वर्गातील मुलगी पाणी शेंदत असताना ती आडात पडल्याने तिचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याची दुर्देवी घटना घडली. गायत्री रंगनाथ उगले (११) असे या जखमी मुलीचे नाव. गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात, लांब जाऊन पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होत आहे.

४ दिवसांना येऊ लागले टॅँकर

वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे धरणात टँकर वेळेवर भरण्यासाठी अडचणी येत आहेत. कधी चार दिवसांना तर कधी आठ दिवसाला पाणी गावाला मिळत असल्याचे सरपंच, ग्रामसेवकासह ग्रामस्थांनी सांगितले. टँकरमध्ये बारा हजार लिटर पाणी बसते. दोन टँकर मिळून चोवीस हजार लिटर पाणी येते. परंतु, ते पाणी पुरेसे नसल्यामुळे प्रशासनाने याची नोंद घ्यावी, अशी मागणी होत आहे.
मदत करण्यासाठी पुढाकार

गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या घरची परिस्थीती नाजूक असल्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबीयांना आर्थीक मदत होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे ग्रामसेविका पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.