चहावाला ते रिक्षावाला व्हाया चौकीदार

 

गेले महिनाभर महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय नाट्य संपता संपत नाहीये. एखादी चांगली कादंबरी किंवा चित्रपटाचे कथानक पुढे सरकताना जसे अधिकच रंगतदार होत जाते तसेच हे सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चांडाळ चौकडी विरोधात उठाव करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान होणे हा या नाट्यातला Climax जरी वाटत असला, तरी तो फक्त मध्यांतर ठरू शकतो एवढी दमदार स्क्रिप्ट ही लेखकाने लिहीली आहे. हे लेखक नेमके कोण आणि किती या तर्कात आणि चर्चेत मला जायचे नाही. पण या स्क्रिप्टमध्ये नकारात्मक भूमिकेत उद्धव ठाकरे हेच रंगवले जात आहेत. विशेष म्हणजे यात स्वतः उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय संजय राऊत हेच मोलाचा ‘तोंडभार’ लावत आहेत.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणारे हे आमदार जेव्हा गुवाहाटीमध्ये होते तेव्हा त्यांना उद्धव ठाकरें जवळ ओढण्यापेक्षा त्यांना तोडण्यासाठीच अधिक प्रयत्न झाले. त्यांच्या कार्यालयांवर हल्ले झाले. त्यांचे पुतळे जाळले. पोस्टर,बॅनर फाडले. त्यांच्या विरोधात बैठका, सभा घेतल्या गेल्या. अगदी त्यांचे बाप काढण्यापासून ते त्यांचा बळी देऊन मृतदेह आणण्यापर्यंत भाषा वापरली गेली. ही भाषा चुकीची नक्कीच होती पण किमान हे त्या नेत्यांपर्यंत किंवा त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मर्यादित होते.

पण या पुढे जेव्हा त्या नेत्यांच्या पूर्वायुष्यावर भाष्य करण्यात आले ते खऱ्या अर्थाने धोक्याचे वळण होते आणि तिथेच शिवसेनेचा कडेलोट झाला आहे. किंबहूना संजय राऊतांनीच शिवसेनेला या दरीत ढकलले आहे. संजय राऊत यांनीच उठाव करणाऱ्या शिवसेना नेत्यांच्या इतिहासात डोकवायला आणि खासगी आयुष्यातील गोष्टी बाहेर काढायला सुरूवात केली. एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे, गुलाबराव पाटीलांची पान टपरी होती आणि बरंच काही. संजय राऊत यांचा हा मणिशंकर अय्यर क्षण होता.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी २०१४ च्या निवडणुकांच्या आधी नरेंद्र मोदींच्या पूर्वायुष्यावर असेच भाष्य केले होते. चहावाला असण्यावरून त्यांची खिल्ली उडवली होती. काँग्रेस कार्यालयाबाहेर ते चहा विकू शकतात पण पंतप्रधान नाही होऊ शकत असे त्यांचे विधान होते. पुढे तिच ओळख मोदींनी आपल्या ब्रँडींगसाठी वापरली. ते आवर्जून आपल्या भाषणातून स्वतःला ‘चायवाला’ म्हणवून घ्यायचे. चाय पे चर्चासारखे कार्यक्रम भाजपा घेऊ लागली. अगदी वाराणसीतून मोदींचा उमेदवार म्हणून अर्ज भरतानाही एक चहावाला सोबत होता.

२०१९ साली अय्यर यांचा कित्ता पुढे गिरवत राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ नावाचे कॅम्पेन केले. पुन्हा मोदींनी ह्याच कॅम्पेनचा स्वतःच्या प्रचारासाठी वापर केला. ‘मै भी चौकीदार’ म्हणत ते लोकांमध्ये मिसळले. देशातील सामान्य जनता आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर आपल्या नावापुढे चौकीदार लावू लागले. आगदी नावापुढे ज्या अभिमानाने डॉ., ॲड. किंवा सीए लावले जाते त्या थाटात लोकं चौकीदार शब्द लावत होते. पण तरिही राहुल गांधींनी आपले प्रचार तंत्र बदलले नाही. परिणाम काय झाला? जेवढ्या आक्रमकपणे काँग्रेस हे कॅम्पेन पुढे नेत गेली तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मतदार हे भाजपाकडे ढकलले गेले आणि भाजपा ३००+ जागा घेऊन सत्तेत आली.

अय्यर, गांधींनी दाखवलेल्या याच मार्गावरून आज राऊत, ठाकरे आगेकूच करत आहेत आणि त्यांच्यामागे फरफटत जात आहे शिवसेना संघटना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा विधानसभेत पहिले भाषण केले तेव्हा त्या भाषणाचे भरपूर कौतूक झाले. मुखदुर्बळ अशी प्रतिमा असलेेले मुख्यमंत्री शिंदे हे तब्बल एक ते दीड तास बोलत होते आणि उस्फूर्त अशा नैसर्गिक शैलीत बोलत होते. शिंदे हे वक्तृत्वासाठी ओळखले जात नाहीत. पण तरिही त्यांचे विधीमंडळातले भाषण म्हणजे मनातल्या साचलेल्या भावना व्यक्त करणारे होते. आपल्या दुःखाला वाट करून देणारे होते. ठाम भूमिका मांडणारे होते. ते इतके प्रभावी होते की त्यात असंविधानिक शब्द आला तरी विरोधीपक्षाने त्यावर आक्षेप घेतला नाही. उलट जयंत पाटील यांनी उभे राहून तुम्ही शब्दांची चिंता करू नका. फ्लो तोडू नका असे म्हणत त्यांना प्रोत्साहन दिले.

पण या भाषणावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ही अपेक्षेप्रमाणे टोमणेबाज होती. ‘रिक्षेचा ब्रेक फेल झाला होता’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदेंच्या इतिहासात डोकावण्यालाच प्राधान्य दिले. तर शिंदेंनी पण रिक्षेने मरसिडीजला ओव्हरटेक केले असे म्हणत पलटवार केला.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रिक्षा आणि मरसिडीज ही केवळ दोन वाहने नाहीयेत. तर ते दोन वर्गांचे प्रतिनिधित्व करतात. मरसिडिज ही उच्च भ्रू माणसाची गाडी समजली जाते. तर रिक्षा ही आजही सर्वसामान्य, गरिब, मध्यमवर्गीय, कष्टकरी, चाकरमानी वर्गाचे वाहन समजली जाते. हाच वर्ग शिवसेनेचा पारंपारिक मतदार राहिला आहे. किंबहूना याच वर्गाने शिवसेना या संघटनेची पायाभरणी केली आहे. मोठं केलं आहे. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा याच वर्गातील तरूणांना, लोकांना एकत्र केले. यात रिक्षेवाले, टेम्पोवाले, पान टपरीवाले, गिरणी कामगार असे अनेक घटक होते. हीच लोकं शिवसेनेची ताकद बनली. यांनीच शिवसेना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. उद्धव ठाकरे जेव्हा हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटोग्राफी करत होते तेव्हा हेच रिक्षावाले, पान टपरीवाले शिवसेनेसाठी घाम गाळत होते, प्रसंगी रक्त सांडत होते. अगदी जेलमध्येसुद्धा जात होते. याच घटकांच्या जोरावर आज शिवसेनेने आपलं पक्ष म्हणून अस्तित्व उभं केलं आणि इतके वर्ष टिकवलं. पण उद्धव ठाकरेंनी आज यावरच घाला घातला आहे.

आज महाराष्ट्रात रिक्षा चालवणारी किंशा टॅक्सी चालवणारी किती माणसं आहेत? किती कुटूंबांची चूल या रिक्षा-टॅक्सीवर पेटते याचा अंदाज उद्धव ठाकरेंना आहे का? या रिक्षा-टॅक्सी चालकांचा रोज किती लोकांशी संबंध येतो? आजही इथला सामान्य मतदार मरसिडिजशी स्वतःला कनेक्ट करू शकत नाही. पण रिक्षा त्याला आपलीशी वाटते. रोज तो या रिक्षावाल्यांशी बोलतो. त्यांचे म्हणणे ऐकतो. उद्या या सर्व रिक्षावाल्यांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरे आणि शिवसेने विरोधात बोलायला सुरूवात केली तर किती मोठा प्रभाव तो मतदारांवर टाकू शकतो याची कल्पना आहे?

साधं शिवसेनेच्या नावने चालणाऱ्या किंवा शिवसेना नेत्यांच्या किती रिक्षा युनीयन आहेत हे तरी उद्धव ठाकरेंना ठाऊक आहे? आज जेव्हा रिक्षाचालक आपल्या काचेवर बाळासाहेबांचा किंवा दिघे साहेबांचा फोटो लावून फिरतात तेव्हा ते अप्रत्यक्षपणे शिवसेना या पक्षाचा प्रचार करत असतात आणि हे फक्त निवडणूकी पुरते नाही तर वर्षानुवर्षे मुंबई, ठाणे, कल्याण आणि महाराष्ट्राच्या अनेक शहरांत सुरू आहे.

आज उद्धव ठाकरेंसाठी ट्विटरवर आश्रू ढाळणारी जी पत्रकार, कलाकार वगैरे मंडळी आहेत ना ती शिवसेनेची ना कधी समर्थक होती, ना हितचिंतक होती, ना मतदार होती. शिवसेना या वटवृक्षाची मुळे होती इथला सामान्य गरिब, मध्यमवर्गीय मराठी माणूस. जो कधी रिक्षावाला असतो, कधी वडापाव विकणारा असतो, कधी गिरणी कामगार असतो, कधी मजदूर असतो, डबेवाला असतो, शिपाई असतो, पानवाला असतो, चहावाला असतो, भाजीवाला असतो आणि सगळ्यात महत्वाचं कट्टर हिंदू असतो. उद्धव ठाकरेंनी आपल्या एका वाक्यात हा सर्व वर्ग आपल्यापासून तोडला आहे आणि शिवसेनेच्या मुळावरच घाव घातला आहे.

याचे परिणाम अत्ता कळणार नाहीत. निवडणूका आल्यावर दिसतील. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची नाळ जनतेशी कधी जोडली गेली नव्हतीच, त्यामुळे ती तुटण्याचा प्रश्नच येत नाही. ते दोघे जनतेतून कधी निवडून आलेले नाहीत आणि भविष्यात येण्याची शक्यताही नाही. पण जे शिवसेनेचे नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आमदार, खासदार जनतेतून निवडून जातात त्यांना याचा फटका बसणार आहे आणि याची कल्पना या नेत्यांनाही आहे. त्यामुळे आगामी काळात ते दुसऱ्या पक्षात तरी जाऊ शकतात किंवा एकनाथ शिंदेंच्या जवळ तरी जाऊ शकतात. त्यात आता शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या वळचणीला जाणे हे या शिवसैनिकांना केव्हाही फायद्याचेच असणार आहे. थोडक्यात शिंदेंची रिक्षा उलटवायच्या नादात उद्धव ठाकरेंनी आपली मरसिडीज दरित ढकलली आहे.

– स्वानंद गांगल यांच्या फेसबुक वॉल वरून साभार 

Leave a Reply

Your email address will not be published.