मुंबई दूरदर्शनची पन्नाशी – शेखर जोशी

मुंबई दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई- ३०’ हा पत्ता आजही अस्तित्वात असला तरी खासगी उपग्रह वाहिन्यांच्या भाऊगर्दीत मुंबई दूरदर्शन केंद्राचा हा पत्ता आणि मुंबई दूरदर्शन केंद्रही हरवले आहे. २ ऑक्टोबर १९७२ या दिवशी मुंबई दूरदर्शन केंद्राचा शुभारंभ झाला. २ ऑक्टोबर २०२२ या दिवशी मुंबई दूरदर्शन केंद्राने पन्नाशी पार केली. त्यानिमित्त…

भारतीय जीवन विमा निगम अर्थातच ‘एलआयसी’ त्यांची जाहिरात करताना ‘आयुर्विमाला पर्याय नाही’ अशी करतात.‌ (आता एलआयसीलाही पर्याय निर्माण झाले आहेत)

त्याच धर्तीवर पन्नास वर्षांपूर्वी ‘मुंबई दूरदर्शन केंद्राला पर्याय नाही’ अशी परिस्थिती होती. आता खाजगी उपग्रह वाहिन्यांचा विस्फोट झाला आहे. मात्र पन्नास वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्राला कोणी स्पर्धकच नव्हता. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई दूरदर्शन केंद्राची मक्तेदारी होती. आणि त्या काळात मुंबई दूरदर्शन केंद्राने अनेक उत्तम उत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेच पण त्यांची सांस्कृतिक भूकही भागवली.‌

मुंबई दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम संध्याकाळी सहा/ साडेसहा वाजता सुरू होत असत आणि रात्री दहा-साडेदहा वाजता हे प्रसारण बंद होत असे. सुरुवातीची अनेक वर्ष तरी असेच होते. नंतरच्या काळात दूरदर्शनचे राष्ट्रीय प्रसारण,डीडी मेट्रो आणि अन्य वाहिन्या सुरू झाल्यानंतर कार्यक्रमांच्या प्रसारणाची वेळ वाढली. दरम्यान मुंबई दूरदर्शनचे नाव बदलून ते ‘सह्याद्री’ असे करण्यात आले.

मुंबई दूरदर्शन केंद्राला सुरुवातीपासूनच उत्तम कार्यक्रम, संकल्पना सादर करणाऱ्या प्रतिभावान कार्यक्रम अधिकाऱ्यांची, अभियंत्यांची साथ लाभली. साहित्य, संस्कृती, क्रीडा, आरोग्य, उद्योग, शेती, महिलाविषयक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करून ते सादर केले गेले.

त्यामुळे प्रत्येक मराठी माणूस आणि अमराठी भाषिकही मुंबई दूरदर्शन केंद्रावरील वेगवेगळ्या कार्यक्रम आवडीने पाहत असत. यात प्रामुख्याने मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ या मालिकेचा खास उल्लेख करावा लागेल. अमराठी लोकांमध्येही हे मालिका आवडीने पाहिली जात होती. अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी सादर केलेला ‘चिमणराव’ आणि बाळ कर्वे यांनी साकारलेले ‘गुंड्याभाऊ’ आजही प्रत्येकाच्या मनात ठसले आहेत.

खासगी उपग्रह वाहिन्यांच्या आजच्या विस्फोटात प्रादेशिक वाहिन्यांवरून आज मोठ्या प्रमाणात दैनंदिन मालिका सादर होतात. मात्र याची सुरुवात मुंबई दूरदर्शन केंद्रावरून झाली. त्याकाळी ‘श्वेतांबरा’ ही मराठी मालिका दूरदर्शनच्या पडद्यावर सादर झाली. ती मालिकाही आजही अनेकांच्या आठवणीत आहे. मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती, सिंधी भाषेतील कार्यक्रमही मुंबई दूरदर्शन केंद्रावरून सादर होत असत. मराठी कार्यक्रमांच्या मांडीला मांडी लावून हे कार्यक्रम विशेषतः गुजराती कार्यक्रम सादर होत असल्यामुळे त्यावेळी मराठी भाषिकांमध्ये नाराजी ही पसरली होती.

मुंबई दूरदर्शन केंद्रांवरून सादर झालेला ‘शालेय चित्रवाणी’ हा कार्यक्रम ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय होता. शाळांशाळांमध्ये आणि घराघरांत हजारो विद्यार्थी, शिक्षकांनी याचा लाभ घेतला. आता ऑनलाइन शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे मात्र मुंबई दूरदर्शन केंद्रावरून सादर झालेला शालेय चित्रवाणी हा कार्यक्रम या ऑनलाइन शिक्षणाचाच पाया होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

‘प्रतिभा आणि प्रतिमा’, ‘हास परिहास’,, ‘गजरा’, ‘सुंदर माझे घर’, ‘किलबिल’, ‘युवदर्शन’, ‘ज्ञानदीप’, ‘मुलखावेगळी माणसे’, ‘मुखवटे आणि चेहरे’, ‘फुल खिले है गुलशन गुलशन’, ‘आरोग्य संपदा’, ‘शरदाचे चांदणे’, ‘अमृतवेल’ अशा मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मोहीनी घातली.

‘कामगार विश्व’, ‘आमची माती आमची माणसे’ यांचाही प्रेक्षकवर्ग होता. ‘आमची माती आमची माणसं’ यामध्ये सादर होणारा ‘गप्पागोष्टी’ हा कार्यक्रम लोकप्रिय ठरला. ‘आरोही’, ‘शब्दांच्या पलीकडले’, ‘नाट्यसंगीत’, ‘शाम-ए-गझल’ अशा सुरेल कार्यक्रमांनी संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील बातम्या आवडीने ऐकल्या जात होत्या. मराठी बातम्या देणारे भक्ती बर्वे, अनंत भावे, प्रदीप भिडे, चारुशीला पटवर्धन, विनायक देशपांडे, हिंदी बातम्या देणारे हरीश भिमाणी, सरिता सेठी तर इंग्रजी बातम्या देणाऱ्या लुकू संन्याल हे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले होते.

हिंदी चित्रपट गाण्यांचा छायागीत, चित्रहार मराठी गाण्यांचा चित्रगीत, निवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी व हिंदी चित्रपट, हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभिनेत्री दिग्दर्शक कलाकार यांच्या मुलाखतींचा तबस्सुम यांचा ‘फुल खिले हे गुलशन गुलशन’ तसेच मराठी नाटक हे सर्व कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणीच होती.

दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात सादर झालेल्या हम लोग’, ‘बुनियाद’ आणि रामायण व महाभारत या मालिकांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
१९९० च्या दशकामध्ये खासगी उपग्रह वाहिन्यांची सुरुवात झाली

आणि परिस्थिती बदलू लागली. आज सुमारे दीड ते दोन हजार खाजगी उपग्रह वाहिन्या सुरू आहेत. ज्या वाहिन्यांच्या मायाजालात मुंबई दूरदर्शन केंद्र अर्थातच सध्याची सह्याद्री वाहिनी कुठेतरी हरवली आहे.

पन्नाशी पूर्ण केलेल्या मुंबई दूरदर्शन केंद्राने महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि भावनिक जडण-घडण नक्कीच केली. इतर खाजगी उपग्रह वाहिन्यांच्या तुलनेत मुंबई दूरदर्शन केंद्र अर्थात सह्याद्री वाहिनी थोडी मागे पडली असल्याचे जाणवत असले तरीही सह्याद्री वाहिनीने आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवली आहे.

खाजगी वृत्तवाहिन्यांवरील वृत्तनिवेदकांचा आक्रमस्ताळेपणा, आरडाओरड किंवा कोणत्याही विषयावर ‘ब्रेकिंग न्यूज’ करण्याचा अट्टाहास ‘सह्याद्री’ वाहिनीवर नक्कीच पाहायला मिळत नाही. शांत संयमी आणि कोणताही आक्रस्तातळेपणा न करता दिल्या जाणाऱ्या ‘सह्याद्री’च्या बातम्या ऐकाव्याशा वाटतात.

 

खाजगी उपग्रह वाहिन्यांवरील मालिकांमध्ये जे काही दाखवले जाते तो आचरटपणा ‘सह्याद्री’च्या मालिकांमध्ये नसतो किंवा कमी प्रमाणात असतो. मात्र असे असूनही खाजगी वाहिन्यांवरील मालिकांना जो प्रेक्षक वर्ग मिळतो तो ‘सह्याद्री’ वाहिन्यांवरील मालिकांना मिळत नाही हे कटू वास्तव आहे.

ग्रामीण भागामध्ये कदाचित ‘सह्याद्री’ वाहिनीच्या या मालिकांना प्रेक्षक वर्ग असेलही परंतु शहरी भागातील प्रेक्षक वर्ग या मालिकांकडे/ कार्यक्रमांकडे कसा खेचून घेता येईल? याकडे दूरदर्शनने लक्ष देण्याची गरज आहे.

मनोरंजन वाहिन्यांच्या क्षेत्रात कोणीही स्पर्धक नव्हता म्हणून दूरदर्शनच्या मालिका किंवा कार्यक्रम लोकप्रिय झाले की आता पूर्वीसारखे मातब्बर/दिग्गज निर्माते नाहीत म्हणून दूरदर्शनच्या मालिकांना/ कार्यक्रमाला खासगी मनोरंजन वाहिन्यांवरील मालिकांएवढी लोकप्रियता आणि प्रेक्षकवर्ग मिळत नाही?

की दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कार्यक्रम सादर करूनही अन्य खासगी मनोरंजन वाहिन्यांच्या तुलनेत दूरदर्शनच्या मालिकांना आणि कार्यक्रमाला प्रेक्षक मिळत नाहीत?

आपल्या मालिका व कार्यक्रम यांची प्रसिद्धी करण्यामध्ये दूरदर्शन कुठे कमी पडतय का?

याचाही गंभीरपणे विचार करायची गरज आहे.

दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचे नियंत्रण करणारी ‘प्रसार भारती’ ही संस्था आहे. ही संस्था स्वायत्त आहे असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात आजही आकाशवाणी, दूरदर्शनच्या कार्यक्रमांवर केंद्र सरकारचेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नियंत्रण आहे.

केंद्रामध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असू दे पण जे सरकार असेल त्यांचीच तळी उचलण्याचे काम आकाशवाणी आणि दूरदर्शनला करावे लागते, हे कटू वास्तव आहे.

केंद्र सरकारच्या या जोखडातून दूरदर्शन आणि आकाशवाणी ही माध्यमे पूर्णपणे मोकळी होण्याची तसेच इथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनाही अधिक मोकळेपणाने आणि स्वतंत्रपणे काम करण्याची संधी दिली गेली पाहिजे.येथील कार्यक्रम अधिकारी निर्माते कर्मचारी यांनीही आपली मानसिकता बदलली पाहिजे.‌

मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाही अशी ओरड केली जाते. मात्र चांगले आणि दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण होत नाहीत म्हणून मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही की प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही म्हणून चांगले मराठी चित्रपट निर्माण होत नाही?

असेच मुंबई दूरदर्शन केंद्राबाबतही म्हणता येईल. त्यामुळे केंद्र सरकारमधील धोरण ठरविणारे अधिकारी, मंत्री, इथे काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि आपण मराठी प्रेक्षक या सर्वांनीच यावर विचार करायची आवश्यकता आहे.

यातून काही चांगला बदल घडून आला तर मुंबई दूरदर्शन केंद्राला अर्थातच ‘सह्याद्री’ वाहिनीला पुन्हा एकदा नक्कीच पूर्वीचे वैभव प्राप्त होईल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.