दूरसंचार क्षेत्रातल्या थेट परदेशी गुंतवणुकीत तीन वर्षात पाच पट वाढ- मनोज सिन्हा

नवी दिल्ली, दि.२५ – दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गेल्या तीन वर्षात थेट परदेशी गुंतवणुकीत पाच पट वाढ झाली आहे अशी माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली. 2015-16 मध्ये ही गुंतवणूक 1.3 अब्ज डॉलर्स इतकी होती, 2017-18 मध्ये ती 6.2 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे असे त्यांनी सांगितले. नवी दिल्लीत आज “दूरसंचार क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. जनतेला परवडणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे, या गुंतवणुकीतून रोजगार निर्मितीही होईल असे ते म्हणाले. देशाच्या भौगोलिक विविधतेचा योग्य तो उपयोग करुन निमकुशल रोजगाराची निर्मिती करणे आवश्यक आहे आणि त्यात दूरसंचार क्षेत्र महत्वाची भूमिका बजावू शकतो असे त्यांनी सांगितले.

भारताचा प्रवास सध्या टेलिकॉम क्षेत्राकडून डिजिटल भारताकडे सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रीय डिजिटल दूरसंवाद धोरण 2018 नुसार डिजिटल क्षेत्रात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. 2020 पर्यंत भारतात 5 जी नेटवर्क सुरु होईल. त्यातूनही डाटा ॲनालेटिक्स आणि कृत्रिम बुद्धीमत्तासारख्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असे सिन्हा म्हणाले.

दूरसंचार क्षेत्रात व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीने सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच या क्षेत्रातल्या समस्या सोडवण्यासाठी आंतरमंत्रीय गटाचीही स्थापना केली आहे. या गटाच्या बहुतांश शिफारशी मान्य झाल्या असून यावर अंमलबजावणी सुरु आहे असेही ते म्हणाले. भारतासारख्या वेगाने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेत परदेशी गुंतवणुकदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दूरसंचार विभागाच्या सचिव अरुणा सुंदरराजन आणि इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या चर्चासत्रात दूरसंचार क्षेत्राशी संबंधित तांत्रिक विषयावरील सत्र आणि इतर चर्चासत्रे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.