अभिव्यक्ती’च्या ठेकेदारांना दुटप्पीपणा !*

भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली. अभिनेत्री कंगना रणौत यांची बहीण रंगोली चंडेल यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले. या दोघींमधील समान धागा होता तो, त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तबलिगी जमातीविषयी केलेल्या ट्विट्सचा ! ‘कोरोनापेक्षाही तबलिगी जमात ही भारतासमोरची क्रमांक १ ची समस्या आहे’, असे मत बबिता फोगाट यांनी व्यक्त केले, तर रंगोली चंडेल यांनी ट्वीट करून डॉक्टर, तसेच पोलीस कर्मचारी यांच्यावर दगडफेक करणार्‍यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने व्यवस्थेच्या विरोधात रोष व्यक्त केला. कोणतीही सूज्ञ व्यक्ती बबिता फोगीट आणि रंगोली चंडेल यांच्या मतांविषयी आक्षेप घेणार नाही. याचे कारण तबलिगी जमातने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून जो काही धुडगूस घातला आहे, तो प्रसिद्धीमाध्यमांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचला आहे; मात्र क्रियेपेक्षा प्रतिक्रियेचा बोभाटा होत असल्याने बबिता आणि रंगोली यांना लक्ष्य केले जात आहे. व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे.

*तबलिगींविषयी आकडेवारी काय सांगते ?*
पुरोगामी टोळीला तबलिगींविषयी कितीही कळवळा आला, तरी मरकज प्रकरणानंतरच देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली, हे वास्तव आहे. प्रत्यक्ष आकडेही तेच सांगतात. हे आकडे कोणा हिंदुत्वनिष्ठ व्यक्तीने दिलेले नाहीत. प्रत्यक्ष सरकारच त्याविषयी भाष्य करते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन ‘तबलिगी जमातमुळे देशातील २३ राज्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली’, असे प्रतिपादन केले होते. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी त्या वेळची आकडेवारी देऊन सांगितले की, देशातील १४ हजार ३७८ रुग्णांपैकी ४ हजार २९१ रुग्ण तबलिगी जमातशी संबंधित आहेत. या जमातीमुळे आसाममध्ये ९१ टक्के, दिल्लीमध्ये ६३ टक्के, तर उत्तरप्रदेशात ५९ टक्के रुग्ण वाढले. एखाद्या व्यक्तीचे मत सापेक्ष असू शकते; पण आकडे तर खोटे बोलणार नाहीत ! या वास्तवाला धरून कोणी भाष्य केले, तर त्यात आक्षेप नोंदवण्यासारखे काय आहे ? विशेष म्हणजे बबिता फोगाट आणि रंगोली चंडेल यांच्या विरोधात बोलणारी ‘जमात’ जेव्हा तबलिगींनी डॉक्टर आणि पोलीस यांच्यावरच दगडफेक करत, रुग्णालयातच अश्‍लील वर्तन करत उच्छाद मांडला होता, तेव्हा मूग गिळून गप्प होती.

*अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ठेकेदारांचा दुटप्पीपणा !*
गंमत म्हणजे, बबिता आणि रंगोली यांच्यावर टीका करणारी मंडळी एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ढोल बडवत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हे ठेकेदार त्यांच्या विचारांशी सहमत नसणार्‍यांना मात्र विचारस्वातंत्र्य देऊ इच्छित नाहीत. यातच त्यांचा दुटप्पीपणा दिसून येतो. याच काळात हिंदुद्वेषी लेखिका अरुंधती रॉय यांनी ‘कोरोनाच्या निमित्ताने भारतात मुसलमानांचा संहार करण्याच्या दिशेने प्रवास चालू आहे’, अशा प्रकारचे विखारी वक्तव्य केले होते. तेही विदेशी प्रसारमाध्यमांकडे ! याविषयी उत्तरप्रदेश येथे एका हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली, मात्र पोलिसांनी ती नोंदवून घेण्यास नकार दिला. थोडक्यात ‘हिंदु धर्म, देवता, संत, परंपरा, श्रद्धास्थाने, भारतमाता यांच्यावर चिखलफेक केली, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि देश, धर्म रक्षणाच्या संदर्भाने भाष्य केले, तर ती असहिष्णुता’, अशा प्रकारचे वातावरण आहे.

*अभिनंदनीय निर्धार !*
तथाकथित पुरोगाम्यांकडून लक्ष्य केले जात असतांना, धमक्या मिळत असतांना बबिता फोगाट आणि रंगोली चंडेल या मात्र त्यांच्या भूमिकेपासून तसूभरही ढळल्या नाहीत. ‘मी तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणार नाही’, असे म्हणत बबिता यांनी या वैचारिक लढ्यात शड्डू ठोकला, तर रंगोली चंडेल यांनी ट्वीटरच्या पक्षपातीपणावर प्रहार केले. ‘ट्वीटर हे अमेरिकी आस्थापन आहे. तुम्ही ट्वीटरवरून हिंदूंच्या देवतांचा अपमान करू शकता, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ‘आतंकवादी’ म्हणू शकता; मात्र आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांच्यावर आक्रमण करणार्‍यांविषयी काही बोलले, तर तुमचे खाते निलंबित केले जाते. माझे दृष्टीकोन आणि प्रामाणिक मत मांडण्यासाठी मला अशा मंचाची आवश्यकता नाही आणि मी हे खाते परत चालूही करणार नाही’, असे रंगोली चंडेल यांनी सांगितले. हा निर्धार कौतुकास्पद आहे. या वैचारिक लढ्यात धर्म आणि राष्ट्र हिताची सूत्रे मांडणार्‍यांच्या पाठीशी उभे रहाणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे.

*वैचारिक ध्रुवीकरणात योग्य बाजू घ्या !*
गेल्या काही काळामध्ये देशभरात वैचारिक ध्रुवीकरण चालू असल्याचे चित्र आहे. सनातन हिंदु धर्म, भारतमाता यांच्याप्रती आस्था असणारे लोक एकीकडे आहेत, तर त्याची खिल्ली उडवणारे लोक दुसरीकडे आहेत. या दोन्ही गटांच्या सीमारेषेवर असणार्‍यांनी विवेक जागृत ठेवून वस्तूस्थितीचे निरीक्षण केले, तर कोणाची बाजू रास्त आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. शेवटी या वैचारिक लढ्यात धर्म आणि राष्ट्र हिताचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तो दडपला जाणार नाही; कारण ‘सत्य कधी लपून रहात नाही’, हेच सत्य आहे.

– *श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन*

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email