परळ टी टी उड्डाणपूलावरील कामामुळे दुचाकी आणि अवजड वाहनांना १ जूनपासून प्रवेश बंदी
मुंबई, दि. २३
मुंबई पूर्व उपनगर ते शहर यांना जोडणा-या परळ टी टी उड्डाणपूलाच्या डागडुजीचे काम बृहन्मुंबई महापालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे या उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या १ जूनपासून बंदी असेल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई वाहतूक पोलिसांकडून पालिकेला मिळाले आहे. त्यामुळे परळ टीटी उड्डाणपूल सुरू होण्यापूर्वीच अवजड वाहनांना प्रवेशबंदी करणारा हाइट बॅरिअर लावण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पुलावर दुरूस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार याठिकाणी खड्डे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे.
पावसाळी कामांसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पान्शन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. याठिकाणी अवजड वाहनांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत खड्डे पडतात. उड्डाणपुलावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबई महापालिकेला केली होती.