नैतिकता आणि नैतिक मूल्य जोपासणारा समाज विकसित करण्यासाठी शिक्षणाने पाया रचायला हवा : उपराष्ट्रपती
आयुष्यात शांतता आणि समाधान सुनिश्चित करण्यासाठी नैतिकता आणि नैतिक मूल्य जोपासणारा समाज विकसित करण्यासाठी शिक्षणाने पाया रचायला हवा, असे उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज भुवनेश्वर इथे साई इंटरनॅशनल स्कूल येथे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यान देत होते. भावीपिढीला ज्ञानाने सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक, नैतिक आणि धार्मिक मूल्य शिक्षणाद्वारे रुजायला हवीत असे उपराष्ट्रपती म्हणाले. युवा विद्यार्थ्यांमध्ये स्वयंसेवक वृत्ती निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना एनसीसी, एनएसएस, स्काऊट अँड गाईड यासारख्या संघटनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
केवळ शैक्षणिक कामगिरीवर भर न देता, विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासावर भर दिला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तरुणांनी देशाचे जबाबदार नागरिक बनणे अतिशय महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. शिक्षणाची जुनी पद्धत रद्द करुन संशोधनात्मक आणि सर्जनशील विचार प्रक्रियेला प्रोत्साहन द्यायला हवे, असे नायडू म्हणाले. तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या वेगवान घडामोडींची माहिती शाळांनी जाणून घेऊन त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी त्याचा वापर करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशील वृत्तीला प्रोत्साहन देण्याची सूचना त्यांनी शाळांना केली.