‘डोंबिवली रिटर्न’ : अपेक्षा वाढवून पूर्ण करण्यात कमी पडलेला सिनेमा

डोंबिवली दि.०४ – रोजच्या साचेबंद आयुष्यात कधी-कधी असं काहीतरी घडतं की ज्यामुळे सगळं आयुष्यच बदलून जातं. कधी ते बदल आयुष्याला सकारात्मक दिशा देणारे असतात तर कधी आयुष्याची माती करणारे असतात. या दोन्हीच्या टोकावर उभ्या असलेल्या माणसाची गोष्ट ‘डोंबिवली रिटर्न’ या सिनेमात रेखाटण्यात आली आहे. अनंत वेलणकर नावाच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाची ही कथा आहे. डोंबिवलीत राहणारा अनंत मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागात काम करतो. बायको, मुलगी आणि लहान भाऊ असं त्याचं कुटुंब आहे. सकाळची ९.२० लोकल, ऑफिस आणि घर हाच त्याचा वर्षानुवर्ष सुरु असलेला दिनक्रम असतो. आणि मग ‘तो’ दिवस त्याच्या आयुष्यात येतो. दहिहंडीच्या दिवशी एका बड्या हस्तीचा खून होतो. ज्याची लोकलपासून टीव्ही चॅनेलपर्यंत जोरदार चर्चा आहे. दुसऱ्या दिवशी अनंत वेलणकर जेव्हा त्याच्या कार्यालयात बसून दहीहंडीच्या कार्यक्रमाचे फोटोज चेक करत असतो तेव्हा त्याला एक फोटो सापडतो, जो फोटो त्या खूनाचा थेट पुरावाच असतो. त्यानंतर अनंत वेलणकर त्या फोटोचं काय करतो? त्याने त्याचं आयुष्य कसं बदलंत? या साऱ्याची गोष्ट म्हणजे महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित ‘डोंबिवली रिटर्न’ हा सिनेमा.

हेही वाचा :- अभाविप कल्याण शाखा तर्फे विजयोउत्सव साजरा!

सिनेमा पहिल्या मिनिटापासून पकड घेतो. आपल्याला रिलॅक्स व्हायला अजिबात वेळ न देता थेट गोष्टीला सुरुवात होते. ते पाहाताना वातावरणात एक टेन्शन सतत जाणवत राहतं. त्याला पुरक असलेला कॅमेरा, पार्श्वसंगीत आणि अभिनय यामुळे मध्यंतरापर्यंत हे सगळं छान सुरु असतं. पण त्यानंतर सिनेमा ट्रॅक बदलतो. दादासाहेब आणि अनंत वेलणकरमध्ये ज्या युद्धाची अपेक्षा पहिल्या हाफमध्ये निर्माण झालेली असते ते सोडून भलत्याच गोष्टी भलत्याच पद्धतीने घडायला लागतात. जे पाहाण्याशिवाय पर्याय नसतो. एकाचवेळी अनेक दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळे सिनेमाचा तोल ढासळत जातो. क्लायमॅक्सचा चकवा तर थेट फसवलो गेल्याचीच भावना निर्माण करतो. सिनेमात आलेली गाणी पाहताना का? आणि कशासाठी? हा एकच प्रश्न मनात येतो. सिनेमाच्या सुरुवातीचं ‘गोविंदा…’ गाणं मात्र अपवाद ठरलं आहे. हे गाणं मस्त जमलंय आणि त्या गाण्यातूनच सिनेमा ‘सुरु’ होतो. बाकी गाणी फक्त डिस्टर्ब करतात, ज्यांची काहीच गरज नव्हती. थोडक्यात ‘डोंबिवली रिटर्न’ अपेक्षा वाढवून पूर्ण करण्यात कमी पडलेला सिनेमा आहे. पण तरीही एक फॅमिली-पॉलिटिकल-थ्रिलर सिनेमा पाहायचा असेल तर हा सिनेमा तुम्ही नक्की पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published.