डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर तरुणाईचा उत्साह! -‘युवा भक्ती शक्ती दिन’ साजरा

(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)

डोंबिवली दि.२४ :– करोना काळात गेली दोन वर्ष बंद असलेला डोंबिवलीच्या फडके रस्त्यावरील ‘युवा शक्ती भक्ती दिन’ सोमवारी उत्साहात साजरा झाला. सोमवारी पहाटे साडेपाच सहा वाजल्यापासून सकाळी बारा वाजेपर्यंत डोंबिवलीच्या फडके रस्त्यावर तरुणाईचा सळसळता उत्साह पाहायला मिळाला.‌ बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक, आप्पा दातार चौकात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी फडके रस्त्यावर असलेल्या गणेश मंदिरात दर्शन आणि नंतर मित्र मैत्रिणींसमवेत गप्पा, गाठीभेटी, हास्यविनोद, चहा- नाश्ता असा गेल्या अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता आहे. काळानुरूप पिढ्या बदलल्या असल्या तरी ही परंपरा सुरू आहे.

शाळा, महाविद्यालयातील मित्र, माजी विद्यार्थी समुह असे अनेक जण दिवाळीच्या पहिल्या दिवशी ( नरक चतुर्दशी) फडके रस्त्यावर भेटतात.‌

काही वर्षांपूर्वी डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थांनतर्फे येथे जमणा-या तरुणाईसाठी ‘युवा भक्ती शक्ती दिन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत‌ आहे. यंदा श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे स्वप्ना कुंभार-देशपांडे यांच्या संकल्पनेतील ‘नृत्यम भरनाट्यम’ आणि लोकनृत्य संस्थेचा पारंपारिक लोकनृत्याचा ‘नृत्यरंग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अभिनेत्री श्रृती मराठे, अनिता दाते यांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती.‌ पारंपारिक वेशभूषेतील तरुणाई, चौकाचौकात जमलेले मित्र मैत्रिणींचे गट, हास्यविनोद आणि गळाभेट हे दृश्य पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.