डोंबिवलीत प्रदुषण मंडळ कार्यालय हवे…
मनसेची पर्यावरण मंत्र्यांकडे मागणी
डोंबिवली दि.२२ – महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कल्याण कार्यालय डोंबिवली एमआयडीसी परिसरात हलविण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून वारंवार घातक रसायनांवर प्रक्रिया न करता ते मोकळ्या वातावरणात गटारामार्गे किंवा हवेत उत्सर्जित करून प्रदुषण केले जाते. अश्या तक्रारी वारंवार येत असतात. मात्र फक्त निष्पाप नागरीकांना त्रास झाला किंवा मोठा अपघात, स्फोट, गळती, आगीची घटना घडून जेव्हा निष्पाप बळी जातात तेव्हाच एमआयडीसीतील घातक प्रदुषणाकडे शासनाचे लक्ष जाते. यावर मनसेने एका निवेदनाद्वारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे लक्ष वेधले आहे. डोंबिवली शहरात प्रदुषणाचा त्रास हा आता नित्याचाच होत चालला आहे. श्वसनाला त्रास, मळमळ व उलट्या होणे हा त्रास काही ठरावीक परिसरांत नित्याचाच होत आहे.
हेही वाचा :- डिसेंबर 2018 साठी घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांक
या त्रासावर, तसेच प्रदुषणावर मात्र महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे मात्र दुर्लक्ष केले जाते. कदाचित भ्रष्टाचार हे एकमेव कारण या मागे आहे. तसेच डोंबिवली प्रदुषणाबाबत तक्रार करायची झाल्यास त्यांचे कार्यालय कल्याण शहरात असल्यामुळे एमपीसीबीचे अधिकारी व कर्मचारी डोंबिवली एमआयडीसी परिसरात यायला टाळाटाळ करतात किंवा जाणिवपूर्वक वेळेवर उपस्थित रहात नाहीत. जेणेकरुन घातक प्रदुषण करणारी कंपनीला अप्रत्यक्षपणे मदत होते. नागरीकांना मात्र या दोन शहरातील लांबच्या अंतराचा त्रास होतो. तसेच त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली जाते. कल्याणच्या कार्यालयातून डोंबिवली एमआयडीसी परिसरातील प्रदुषणावर नियंत्रण करणे म्हणजे उंटावरू शेळ्या हाकणे असाच प्रकार असल्याचा आरोप मनसेने या निवेदनातून केला आहे.
हेही वाचा :- डोंबिवली – मंदिरातून चांदीचा मुकुट चोरणारा गजाआड
डोंबिवली एमआयडीसी परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अनेक सुसज्ज सर्व सोयीयुक्त मालमत्ता तश्याच धुळ खात पडून आहेत. तसेच एमआयडीसी मालकीचे अनेक व्यावसायीक, माॅल अश्या नविन इमारतींचे बांधकाम सध्या जोरात सुरू आहे. महापालिका व राज्यांत आपले सरकार आहे, मंत्री आपले आहेत अश्या एखाद्या डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मालमत्तेत जर कल्याणचे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय हलवले तर डोंबिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक कंपन्यांकडून जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या प्रदुषणावर आपोआप नियंत्रण येईल. वातावरणात होणाऱ्या प्रदुषणाची त्वरीत दाखल घेऊन त्यावर कारवाईला वेग येईल व प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांमध्ये एक प्रकारचा दबदबा, भीती निर्माण होऊन प्रदुषणावर आपोआप नियंत्रण मिळेल. नागरीकांना प्रदुषणाबाबत तक्रारी करण्यास जवळ पडेल आणि त्यावर नियंत्रण करणे मंडळाला सोपे जाईल. अंबरनाथ-बदलापूर एमआयडीसी परिसरसुध्दा डोंबिवलीपासून जवळ राहिल. प्रदुषणासारख्या घातक विषयापासुन व त्यामुळे होणाऱ्या भ्रष्टाचारावर डोंबिवलीकरांची प्रामाणिकपणे जर मुक्तता करायची असेल तर कृपया महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कल्याण येथील कार्यालय डोंबिवली येथे त्वरीत हलविणे गरजेचे आहे, अशी मागणी केल्याचे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी सांगितले.