डोंबिवलीत ; सनकी डॉक्टर पतीचा बोगस सर्टिफिकेटच्या वादातून पत्नीवर चाकूने हल्ला
डोंबिवली दि.२४ – डॉक्टर पतीने क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून आपल्या पत्नीवर भाजी कापण्याच्या चाकूने हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली. या प्रकरणी जखमी पत्नीने सनकी डॉक्टर पतीविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संतोष देसाई (५७) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डॉक्टर देसाई पत्नी लीला देसाई (४९) सोबत डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम नगरच्या शांती ओम अपार्टमेंटमध्ये राहतो. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने आपली पत्नी लीला यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र मागण्याचा बहाणा करत जोरदार वाद घातला.
हेही वाचा – कल्याण ; गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या मित्राला चाकू व लोखंडी रोड ने हल्ला
त्यावेळी संतापाच्या भरात डॉक्टर देसाईने पत्नी लीला यांचे डोके भिंतीवर आपटून त्यांचा हातही मुरगळला. त्यानंतर किचनमध्ये पडलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने लीला यांना धमकी दिली. दरम्यान पत्नी लीला आणि डॉक्टर संतोष यांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. झटापटीत डॉक्टर देसाईने हातातील चाकूने लीला यांच्या गळ्यावर हल्ला केला. या चाकू हल्ल्यात पत्नी लीला यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी लीला यांच्या जबाबावरून डोंबिवली पोलिसांनी डॉक्टर देसाईविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.