डिजिटल इंडिया पुरस्कार
नवी दिल्ली, दि.२१ – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत 22 फेब्रुवारी 2019 ला डिजिटल इंडिया पुरस्कारांचे वितरण होणार आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरतर्फे (एनआयसी) या पुरस्कारांचे आयोजन केले जाते. वर्ष 2010 पासून दर दोन वर्षांनी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचे हे पुरस्कारांचे पाचवे वर्ष आहे. डिजिटलकरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी विभागांचा या पुरस्कारांद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.
हेही वाचा :- रुग्णालयांसाठी प्रवेशस्तरीय प्रमाणपत्र प्रक्रियेत एनएबीएचकडून सुधारणा
उदयोन्मुख तंत्रज्ञान, सर्वोत्तम मोबाईल ॲप, सर्वोत्कृष्ट ऑनलाइन सेवा, ओपन डेटा चॅम्पियन, वेब रत्न-मंत्रालय / विभाग, वेब रत्न-राज्य / केंद्रशासित प्रदेश, वेब रत्न-जिल्हा, स्थानिक प्राधिकरणाचा सर्वोत्तम डिजिटल उपकरण अशा वर्गवारीत हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये ‘उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या नव्या वर्गवारीचा समावेश करण्यात आला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशिन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, व्हर्च्युअल रिॲलिटी, ब्लॉक चेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज, व्हॉइस युजर इंटरफेस, बिग डेटा ॲण्ड ॲनलिटिक्स अशा उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या डिजिटल उपक्रमांचा गौरव या वर्गवारीत करण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे.