दाट धुक्यातही ‘आयमेथॉन’मध्ये धावले कल्याणकर
कल्याण दि.११ :- कल्याण इंडियन मेडीकल असोसिएशनने (आयएमए) आयोजित केलेल्या ‘आयमेथॉन-2019’ या मॅरेथॉन स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला पाहायला मिळाला. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून सुमारे दिड हजार स्पर्धक त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दाट धुके असतानाही स्पर्धकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा 3 गटांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा :- Dombivali ; चुकीच्या दुभाजकामुळे होताहेत अपघात
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, मिस्टर एशिया बॉडीबिल्डर्स स्पर्धेतील कांस्यपदक विजेता संतोष चाहल आदी मान्यवरांच्या प्रमूख उपस्थितीत या वेगवेगळ्या स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला. तर या स्पर्धेच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत ‘सदिच्छा’ या विशेष मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या कल्याणातील शाळेला करण्यात आली.
हेही वाचा :- ठामपा सुरक्षा अधिकाऱ्याची दारू पिऊन सुरक्षाचे कर्तव्य
तर या स्पर्धेला मिळत असणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात मुंबई मॅरेथॉन, ठाणे मॅरेथॉनप्रमाणेच या ‘आयमेथॉन’चा नावलौकिक होईल असे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी काढले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सांगळे, सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश राघवराजू, टास्क लिडर डॉ. अश्विन कक्कर, डॉ. सोनाली पाटील यांच्यासह संस्थेच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी डॉ. सुरेश एकलहरे, अशोक प्रधान, लेले मॅडम, माजी नगरसेवक सुनिल वायले, कल्याण शहर ट्रॅफिक एसीपी निघोट, वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.