शिव्या घालायचा सामुदायिक सोहळा, हुतात्मा होण्याचा प्रयत्न की भाजपचाच डाव…

शिव्या घालायचा सामुदायिक सोहळा,
हुतात्मा होण्याचा प्रयत्न की भाजपचाच डाव…

शेखर जोशी
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते, खासदार, आमदार यांनी सत्तेतील आपले भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसला यथेच्छ शिव्या घालायचा सामुदायिक सोहळा सुरू केला आहे.

महाविकास आघाडीतील हे दोन्ही पक्ष शिवसेनेला, शिवसैनिकांना संपवायला निघाले आहेत, असा थेट आरोप करत शिवसेना नेत्यांनी ‘या सत्तेत आता काही राम उरला नाही’ असे आळवायला सुरुवात केली आहे.

संपूर्ण देशात मोठ्या सिनेमा वितरक/प्रदर्शक कंपन्या असलेल्या पीव्हीआर आणि आयनॉक्स यांचे विलिनीकरण धोकादायक

गेली दोन अडीच वर्षे सत्तेचा उपभोग घेतल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावरून गच्छंती होऊ शकते म्हणून की आयकर, सक्तवसुली संचालनालय आदी विविध शासकीय यंत्रणा पाटणकर काढ्याच्या निमित्तमाने थेट घरापर्यंत येऊन पोहोचल्या म्हणून हा साक्षात्कार झाला आहे?

मला वाटते याची सुरुवात शिवसेना नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील अणि दापोली तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना किर्तीकर यांनी केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र प्रत्यक्षात लाभ करून घेत होते पवार सरकार’ असे विधान केले.

शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. या आधीही गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही थेट टीका केली होती. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी सोलापूर येथे बोलताना अर्थसंकल्पातील सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना, त्या खालोखाल काँग्रेसला आणि उरला सुरला शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळतो.

सावंत यांचे भाषण जोरदार झाले होते. दोन्ही कॉंग्रेसकडून आजवर शिवसेना व शिवसैनिकांवर कसा अन्याय झाला याचा पाढा त्यांनी काही उदाहरणांसह वाचला. असाच अन्याय होत असेल तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबाबत फेरविचार करावा.

तिकडे शिवसेनेचा मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पार्थ पवार याच्यासाठी सोडावा असा दबाव राष्ट्रवादीकडून शिवसेनेवर टाकला जात आहे. हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तेथील विद्यमान खासदार आहेत.

कोल्हापूर उत्तर विधासभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणूक होत आहे. तेथे जाधव यांच्या पत्नीस कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून चंद्रकांत जाधव यांच्याआधी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर आमदार म्हणून निवडून आले होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी क्षीरसागर यांचा पराभव केला होता. त्यामुळे खरेतर हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. कॉंग्रेसने मुंबईतील एक जुने प्रकरण उकरून काढले आहे. मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावरून न्यायालयात खेचले आहे.

सचिन वाझे प्रकरण शिवसेनेच्या अंगाशी आले होते. त्यानंतर अनिल परब यांचे बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरण चर्चेत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील धाडी, एकाच इमारतीत ३१ सदनिका खरेदी, ‘मातोश्री’ ला पन्नास लाखांचे घड्याळ, दोन कोटींच्या भेटवस्तू हे प्रकरणही अंगावर शेकण्याची शक्यता आहे.

आणि उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या धाडीमुळे फास गळ्यापर्यंत आवळला गेला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आता काहीच पर्याय उरलेला नाही. आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे संपत आल्याने शरद पवार आता कधीही हकालपट्टी करतील अशी भीती मनात आहे.

त्यामुळेच ‘हुतात्मा’ होण्यासाठी, आम्हाला सत्तेत कसा रस नाही, आम्ही सत्तेवर लाथ मारून बाहेर पडू शकतो असा आव आणत आणि देखावा तयार करून सहानूभूती मिळविण्याचा तुमचा हा प्रयत्न केविलवाणा व हास्यास्पद आहे.

भाजप- शिवसेना युती २०१४ ते २०१९ असताना- आधी तुम्ही सत्तेत सहभागी झाला नाहीत. नंतर सहभागी झालात पण प्रत्येक वेळेस खिशात राजीनामे घेऊन फिरतोय असे सांगत बसलात. प्रत्यक्षात कधीच राजीनामा दिला नाहीत.

एवढेच होते तर सत्तेत सहभागी न होता बाहेरून पाठिंबा द्यायचात आणि नाहीतर राजीनमा देऊन बाहेर पडायचे आणि भाजपचे सरकार पाडायचे. पण ती ही हिंमत दाखवली नाही)

उद्धव ठाकरेजी तुमचे सगळेच निर्णय पहिल्यापासूनच चूकत गेले. मुळात तुम्ही दोन्ही कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत गेलात तिथेच तुमचे चुकले.

बरे भाजपला धडा शिकवायचा होता आणि पुन्हा भाजपबरोबर जायचे नव्हते तर विरोधात बसायला हवे होते. भाजप व राष्ट्रवादीत किंवा शिवसेनेतील काही फुटून भाजपला मिळाले असते तरी तुमचे स्वतःचे स्वत्व, बाणा कायम राहिला असता.

तुम्हाला भाजपला नालायक ठरविण्याची आणि त्यांना उघडे पाडण्याची संधी आयतीच हातात मिळाली असती. तुमचीही मान ताठ राहिली असती. आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे सांगत राहिलात पण पूर्वीचा कडवट, कट्टर हिंदुत्ववाद महाविकास आघाडीबरोबर गेल्यावर कधीच दिसला नाही.

दाऊदशी/ त्याच्या संबंधितांशी व्यवहार करणारे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची किंवा त्यांची हकालपट्टी करण्याची धमक तुम्ही दाखवू शकला नाहीत.

मी या आधीही लिहिलेल्या पोस्टमधून वारंवार सांगितले की उद्धवजी तुमच्या भोवताली जे बदसल्लागार आहेत ते बदला, त्यांचा बदसल्ला न ऐकू नका. ऐकून घेतला तर त्याप्रमाणे कृती करू नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. कारण हेच निर्णय, हिच माणसे तुम्हाला, शिवसेनेला एक दिवस खड्ड्यात घालणार आहेत. आणि आता तेच होताना दिसत आहे.

विनाशकाले विपरित बुद्धी हे खरे करून दाखवता आहात. ज्या माणसावर कॉंग्रेसने कधीही विश्वास ठेवला नाही, ज्यांचे सर्व राजकारण विश्वासघात, तोडफोड यात गेले,

ज्या माणसाची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला गेली आहे अशा शरद पवारांसारख्या माणसाच्या व ज्यांचा पक्षच मुळात पश्चिम महाराष्ट्रवादी आहे आणि ज्या पक्षाचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर होते त्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीलाच शिवसेनेला बांधले.

महाराष्ट्रात नष्ट होण्याच्या मार्गावर असणा-या दोन्ही कॉंग्रेसना तुम्हीच पुन्हा जिवंत केले. या अडीच वर्षांतील हेच तुमचे कर्तृत्व. मुळात भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना बरोबर घेऊन (शरद पवार यांच्याच संमतीने) बोहल्यावर चढायची गरज नव्हती.

ती घोडचूकच होती. बरे नंतर एकदा महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर गुडघ्याला बाशिंग बांधून आता हे सरकार पडेल, नंतर पडेल असे सांगून पाडायचे प्रयत्न करण्याचीही गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्वच प्रमुख नेते आम्ही सरकार पाडून सत्तेत येण्याच्या वल्गना करत होते.

ते ही चुकीचेच होते. महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कर्माने किंवा आपापसातील भांडणातून कधी पडते त्याची वाट भाजपने पाहायला हवी होती. पण तसे घडले नाही आणि भाजपही चुकीच्या मार्गाने गेला. असो. आता इतके सर्व रामायण घडून गेल्यावर पून्हा भाजपने शिवसेनेला चूचकारू नये किंवा शिवसेनेनेही भाजपबरोबर जमवून घेऊ नये.

आता जे काही होईल ते आगामी विधानसभा निवडणुकीतच होऊ दे. ती वेळ कधीच निघून गेली आहे.

त्यामुळेच शिवसेना नेते, खासदार, आमदार आता महाविकास आघाडीत आमच्यावर कसा अन्याय झाला हे सांगत आहेत ते खरोखरच पोटतिडकीने सांगत आहेत ( तसे जर खरे मानायचे झाले तर याचा अर्थ महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा तुमचा निर्णय हा तेव्हाही काही शिवसेना नेत्यांना मान्य नव्हता पण बदसल्लागारांच्या सल्ल्याला बळी पडून तुम्ही हा निर्णय घेतलात आणि तो सर्वांवर लादलात असेच म्हणावे लागेल) की आता थेट ‘मातोश्री’च्या गळ्याशी आल्यामुळे तुम्हीच त्यांचे बोलविते धनी आहात की सरकार खिळखिळे करून, शिवसेनेतील काही जणांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्याच नेत्यांचा हा डाव आहे हे येणारा काळच ठरवेल.

@शेखर जोशी यांच्या फेसबूक वॉल वरून साभार

 

 

 

 

 

 

 

 

३० मार्च २०२२

Leave a Reply

Your email address will not be published.