उद्धव ठाकरे यांचा सोयीस्कर कानाडोळा

(शेखर जोशी)
विधिमंडळातील आमदारांचे संख्याबळ घटलेले दिसत असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल-बुधवारी फेसबुक लाईव्ह केले. या फेसबुक लाईव्हमधून उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत गेलेल्या आमदारांना भावनिक साद घालून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला पण एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या महत्वाच्या मुद्द्याकडे मात्र सोयीस्कर कानाडोळा केला. त्याविषयी एक चकारशब्दही उच्चारला नाही.

सोमवारी रात्री उशिरा विधानपरिषद निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने महाविकास आघाडीची मते फोडून आपला सहावा उमेदवार निवडून आणला. कॉंग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पण आपले दोन उमेदवार निवडून आले याच्या जल्लोषात शिवसेना मग्न राहिली. त्या रात्रीत एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार सुरतला रवानाही झाले. मंगळवार उजाडला तोच राजकीय भूकंपाची बातमी घेऊन. बातमी सर्वदूर पसरली आणि मग एकच राजकीय पळापळ सुरू झाली.

दुपारनंतर पक्षनेतृत्वाने एकनाथ शिंदे व इतरांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक या दूतांना सुरतला पाठवले. (इथेही उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई, दिवाकर रावते किंवा इतर ज्येष्ठांना डावलून पुढे आणलेल्या/लादलेल्या आदित्य ठाकरे यांना पाठवले नाही हे विशेष. म्हणजे समजूत काढणे हा उपचार होता का?) नार्वेकर व फाटक यांनी नाराज एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी म्हणे बोलणे करून दिले. त्यावेळी आणि नंतरही (सोशल मिडियाच्या माध्यमातून) शिंदे यांनी दोन महत्वाचे मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यातील पहिला महत्वाचा मुद्दा होता दोन्ही कॉंग्रेसबरोबर केलेली आघाडी तोडून सरकारमधून बाहेर पडावे आणि दुसरा मुद्दा होता भाजपबरोबर सरकार स्थापन करावे.

खरे तर अडीच वर्षांपूर्वी शिवसेना अनपेक्षितपणे शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसबरोबर गेली तेच मुळात सर्वसामान्य कट्टर शिवसैनिक आणि काही नेत्यानाही रुचले नव्हते. पण तेव्हा कोणी काही बोलले नाही. सत्ता काबीज केल्यानंतर राष्ट्रवादीने जे रंग दाखवायला सुरुवात केली त्यामुळे काही शिवसेना नेते, आमदार यांच्यात अस्वस्थता पसरली. ही खदखद शिवसेना नेते अनंत गीते, रामदास कदम, आमदार तानाजी सावंत यांनी जाहीरपणे व्यक्तही केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बदसल्लागारांच्या चौकडीतच रमले. संजय राऊत अनेक प्रकरणात उलटे सुलटे बोलून शिवसेनेला अडचणीत आणत होते, तिकडे शरद पवार सांगतील त्यांच्या हो ला हो करण्यातच उद्धव ठाकरे धन्यता मानत होते. अर्णव गोस्वामी, कंगना राणावत, पालघर साधू हत्याकांड या आणि अशाच काही प्रकरणी शिवसेनेची बदनामी झाली, पण तरीही उद्धव ठाकरे ‘शांत’ राहिले. ही साचून राहिलेली खदखद आता बाहेर पडलो.

त्यामुळे बुधवारच्या फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्राधान्याने दोन्ही कॉंग्रेसबरोबर केलेली आघाडी नको, पहिल्यांदा या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, या एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलणे, भाष्य करणे आवश्यक होते.

भले तुम्हाला ते योग्य वाटत होते तर ते कसे योग्य आहे हे तरी सांगायला हवे होते. किंवा तुम्ही हा उपस्थित केलेला मुद्दाच चुकीचा आहे, असे तरी बोलायला हवे होते. पण याविषयी उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत.

मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला नको असेन तर तसे मला समोर येऊन सांगा, मला सत्तेचा मोह नाही, मी मुख्यमंत्रीपद सोडतो, हवे तर पक्षप्रमुखपदावरही राहात नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. पण पुलाखालून इतके पाणी वाहून गेल्यावर तुम्हाला आत्ता जाग आली का? असा प्रश्न बंडखोर शिवसेना आमदारांना पडला.

कु-हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीविषयीची लाकुतोड्याची गोष्ट त्यांनी सांगितली. पण शिवसेना आणि तुमच्यावर ओढवलेल्या आजच्या परिस्थितीला बदसल्लागारांवर, संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर टाकलेला आंधळा विश्वासच कारणीभूत आहे, आणि त्यामुळे लाकुडतोड्याची ही गोष्ट प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष तुम्हालाच लागू पडते हेच खरे वास्तव आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एक, दोन वेळेस मी शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामा देतो, अशी घोषणा केली होती. पण ते बाळासाहेब होते आणि ते त्यांनाच शोभणारे होते. उद्धव ठाकरे यांनी त्याचा कित्ती गिरविला असला तरी त्याला एकनाथ शिंदे आणि इतर कोणीही धूप घातली नाही,हे गुरुवारी स्पष्ट झाले.

शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या वाढता वाढता अशीच राहिली आहे. त्यामुळे अल्पमतात आलेले मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हे भाषण भावनेला साद घालणारे असले तरी वास्तवाचा, कटू सत्याचा मिळालेला डोस न पचविणारेच ठरले असेच म्हणावे लागेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.