मुंबई दि.२९ :- राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्वेक्षण करावे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील वॉर रूममध्ये राज्यातील दहा महत्वांच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो, सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्गलगत इकॉनॉमिक झोन या प्रकल्पांबाबत तसेच मुंबई मेट्रो मार्गिका ४,चार ए, आणि ११ साठी मोगरपाडा येथे डेपो करण्याकरिता जमीनसंपदा, ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.