देशभक्ती आणि राष्ट्र बांधणी या विषयावरच्या राष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमाचे कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी दिल्ली, दि.२४ – देशभक्ती आणि राष्ट्रबांधणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, सरकार आणि नागरिक यांच्या समन्वयातूनच राष्ट्रबांधणी शक्य आहे, असे मत केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांनी व्यक्त केले. नवी दिल्लीत नेहरु युवा केंद्र संघटना आणि युवक व्यवहार विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिसंवाद स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी ते आज बोलत होते. देशाच्या उभारणीत प्रत्येक युवकाचा सहभाग आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भारत हा विविधतांचा देश आहे आणि म्हणूनच एकत्रित बांधण्याचे तसेच देशभक्तीचे प्रतिक म्हणून राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा :- प्लास्टीकचा वापर अनिवार्य; मात्र तो काळजीपूर्वक आणि आवश्यक तेवढाच करायला हवा – उपराष्ट्रपती

संविधानाने प्रत्येकालाच मूलभूत अधिकार दिले आहेत, मात्र त्यासोबतच जबाबदाऱ्यांचेही भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी 29 राज्यांतून आलेल्या काही स्पर्धकांशीही राठोड यांनी संवाद साधला. युवक आणि सर्वसामान्य नागरीकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना बळकट करण्याच्या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे. त्याशिवाय युवकांमधले नेतृत्व गुण आणि उत्तम संवाद कौशल्य याला व्यासपीठ मिळावे, असाही स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेनिमित्त युवकांना सरकारी धोरणे आणि कामकाजाची माहितीही मिळू शकेल. या स्पर्धेत 40 हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून, गट, जिल्हा आणि राज्य अशा तीन पातळ्यांवर ही स्पर्धा घेतली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.