कल्याण रेल्वेस्थानकातून मुलाचे अपहरण चोरटा सीसीटीव्हीत कैद
कल्याण पश्चिम येथील आंबेडकर रोड परिसरात राधा भोईर आपला पती व मुलांसोबत राहते. आठ तारखेला सायंकाळी राधाचे पतीसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात राधाने आपल्या दोन मुली आणि आठ महिन्यांचा मुलगा कार्तिक याला घेऊन रात्री १०.३०च्या सुमारास कल्याण स्टेशन गाठले. ती चेन्नईची ट्रेन पकडून आपल्या गावी जाण्याच्या तयारीत होती. कल्याण रेल्वे स्टेशन क्र. २ वरील मुंबईच्या बाजूकडील पुलावरून चढत असताना तिच्या हाताला एक मुलगी होती आणि दुसरी मुलगी कल्पनाच्या हातात आठ महिन्यांचा कार्तिक होता.
याच वेळी त्यांच्या मागावर असलेला एका इसम कल्पनाच्या जवळ आला. त्याने कल्पनाच्या हातात असलेल्या मुलाला आपल्या हातात घेतले आणि कल्पनाचा हात पकडून जिना चढू लागला. काही वेळात या अनोळखी व्यक्तीने कल्पनाला तू तुझ्या आईला पुढे घेऊन ये, असे सांगितले कल्पना मागे चालत असलेल्या आईला पाहण्यासाठी गेली असता हा अनोळखी इसम कार्तिकला घेऊन पसार झाला. याबाबत राधा व तिच्या पतीने कल्याण रेल्वे पोलिस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली असून तपास सुरू आहे.
सीसीटीव्हीमधील आरोपी नजरेस पडल्यास कल्याण रेल्वे पोलिस ठाणे येथे संपर्क करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, या घटनेला सहा दिवसांचा कालावधी लोटला असून अद्याप मुलाचा शोध न लागल्याने कार्तिकचे आई-वडील काळजीने त्रस्त असून आई राधा हिची प्रकृती खालावली आहे.