मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकानुनयाला बळी पडले

 

मुंबई दि.२२ :- गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध हटविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय न पटणारा आहे. त्यांनी हा निर्णय लोकानुनयाला बळी पडून घेतलेला आहे. राज्य प्रमुखांनी प्रसंगी कटू व अप्रिय वाटले तरी काही ठोस निर्णय लोकानुनयाला बळी न पडता घ्यायचे असतात.

करोनाच्या निमित्ताने का होईना सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणली गेली होती ती चांगली गोष्ट झाली होती.

मुळात सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहीहंडी हे उत्सव आता ‘इव्हेंट’ झाले आहेत. या उत्सवातील पावित्र्य, मांगल्य काही अपवाद वगळता पूर्णपणे संपले आहे. हे उत्सव म्हणजे सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी मनी व मसल पॉवरचा खेळ झाला आहे.

रस्ते अडवून मंडप आणि पादचारी, वाहनचालक, वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे मंडप उभारणे, या सर्व उत्सवात छातीत धडकी भरेल, कानाचे पडदे फाटतील अशा प्रकारे आगमन, विसर्जन मिरवणूक काढणे, अचकट, विचकट गाण्यांवर अश्लील हावभाव करत नृत्य करणे म्हणजेच उत्सव साजरे करणे आहे का? कोणाही सुजाण, सुसंस्कृत आणि साधक-बाधक विचार करणारे नागरिक याचे उत्तर नाही असेच देतील.

गेली दोन वर्षे करोनामुळे का होईना गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दहीहंडी यावर निर्बंध आल्यामुळे हे सर्व उत्सव शांततेत, पावित्र्य जपत साजरे झाले होते. गेल्या काही वर्षांपासून या सर्व उत्सवांचे जे व्यापारीकरण, विकृतीकरण झाले होते त्याला खरोखरच पायबंद बसला होता. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटविले.

आता उद्या करोनानिमित्ताने घातलेले आगमन/विसर्जन मिरवणुकीवरील, डीजेरील निर्बंधही हटविले जातील. तसा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतीलही. म्हणजेच करोनामुळे थांबलेला धांगडधिंग्याला, उत्सवातील व्यापारीकरण, विकृतीकरणाला पुन्हा चालना मिळणार आहे.

खरे तर गणपतीच्या उंचीवर मर्यादा आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी, फक्त शाडू मातीचीच मूर्ती हे निर्णय योग्यच होते. आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत निर्णय घेण्यासाठीही एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. याची काहीही गरज नव्हती.

प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची किती हानी होते, हे वेळोवेळी समोर आले आहे. सर्व विचार करूनच गणेशमूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नको, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा समिती नेमण्याचा हा निर्णयही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविणारे मूर्तीकार, मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, सर्वपक्षीय राजकीय नेते यांच्या दबावाला बळी पडूनच घेतला आहे, असेच म्हणावे लागेल.

काही वर्षापूर्वी शिवसेनेच्या तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तींच्या उंचीवर मर्यादा घालण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र त्यावेळी पुरोगामी आजोबांचा वारसा सांगणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे डॉ. राऊळ यांच्या पाठीशी उभे राहिले नव्हते, हे आठवले.

सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि दहीहंडी उत्सवावर काही निर्बंध आणले म्हणजे हिंदुत्व धोक्यात आले, हा हिंदुत्व, हिंदू धर्मावरचा घाला आहे, असे काहीही नाही. आपल्या उत्सवातील पावित्र्य जपणे आणि त्याचे झालेले व्यापारीकरण, विकृतीकरण थांबविणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. मी ही हिंदुत्वाचा, हिंदू धर्माचा कट्टर अभिमानी आहे पण म्हणून आपल्या उत्सवातील अपप्रकार, त्याचे विकृतीकरण याचे समर्थन मी कधीही करणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता गणेशमूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटविले आहेत. आता सार्वजनिक दहिहंडी मंडळांकडूनही दहिहंडीच्या उंचीवरील निर्बंध हटविण्याची मागणी होईल. पुन्हा एकदा लोकानुनयाला बळी पडून मुख्यमंत्री शिंदे ही मर्यादाही हटवतील. पण त्यामुळेच आपण पुन्हा एकदा त्याच दुष्टचक्रात अडकणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकानुनयाला बळी न पडता सारासार विचार करून निर्णय घ्यावेत. शक्य असेल तर उंचीवरील निर्बंध हटविण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा आणि गणेशमूर्तींच्या उंचीवर आधीप्रमाणे मर्यादा घालावी.

शेखर जोशी यांच्या फेसबुक वॉल वरून साभार 

Leave a Reply

Your email address will not be published.