चंद्रकांत पाटीलजी तुमचे चुकलेच..

शेखर जोशी

गणपती मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नको, अशी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली मागणी चुकीची व पर्यावरणनाशक आहे. लोकानुनय सोडा आणि भानावर या. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असा टेंभा मिरविणा-या तुमच्या पक्षाने या निर्णयाचे स्वागत करायला हवे होते.

मूर्तीच्या उंचीवर घातलेली मर्यादा आणि आगमन- विसर्जन मिरवणुकीला घातलेले निर्बंध यापुढेही कायम राहिले पाहिजेत.

करोनाच्या नावाने किंवा निमित्ताने का होईना पण गेल्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवावर काही निर्बंध लादण्यात आले. आगमन आणि विसर्जन मिरवणूक नको यासह सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीची मूर्ती चार फूट इतकीच असावी अशी ती मर्यादा होती. त्या निर्बंधांमुळेच गेल्यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव खूप शांततेत पार पडला.

गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रौत्सव यातील सण, उत्सव, पावित्र्य हरविले आहे. त्याचे व्यापारीकरण आणि विकृतीकरण झाले आहे. हे उत्सव म्हणजे ‘इव्हेंट’ झाला असून सर्वपक्षीय राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी तो मनी, मसल पॉवर गेम झाला आहे.

रस्ता आणि वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे मंडप उभारणे, आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत छातीत धडकी भरेल आणि कानाचे पडदे फाटतील अशा डीजेच्या भींती उभ्या करणे, अचकट विचकट नृत्य करणे, उंचच उंच मूर्ती उभ्या करणे म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव असा गैरसमज निर्माण केला गेला होता.

प्रसार माध्यमानीही या सर्व प्रकाराला कमी-अधिक प्रमाणात खतपाणी घातले. उंचच उंच मूर्तींच्या गळेकापू हव्यासापोटी पर्यावरणनाशक प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर, उंच मूर्तींची विसर्जन झाल्यानंतर होणारी विटंबना हे सगळे समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सवाला जे व्यापारी, बाजारी आणि विकृत स्वरूप आले आहे ते कोणाही सुजाण व समंजस नागरिकांना पटणारे नाही. मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे.

माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवातील मूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्यासाठी प्रयत्न केले होते. पण तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली नाही. त्या एकट्या पडल्या आणि हा प्रश्नच मागे पडला. ‘प्रबोधना’चा वारसा सांगणा-या उद्धव ठाकरे यांनी तेव्हा ते धाडस दाखवले नाही. आणि नांगी टाकली.

राजकीय नेत्यांनी प्रसंगी लोकानुनय न करता समाजहित म्हणून काही कटू निर्णय घ्यायचे असतात. तशी हिंमत व धमक दाखवावी लागते. उद्धव ठाकरे यांनी तेव्हा ती दाखवली नाही.

आपण ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत असा टेंभा भाजप मिरवित असतो. ते वेगळेपण दाखविण्याची संधी भाजपला यानिमित्ताने मिळाली आहे. कटू वाटली तरी समंजस भूमिका घ्या. समंजस व सुजाण नागरिक याचे स्वागतच करतील.

असे निर्बंध म्हणजे हिंदू धर्मावर घाला आहे असाही कांगावा व ओरड केली जाते व जाईल. मात्र त्याला काहीही अर्थ नाही. आणि आपल्या कोणत्या धर्मग्रंथात उंचच उंच मूर्ती तयार करा, आगमन व विसर्जन मिरवणुकीत अचकट विचकट नृत्य करा, लोकांना त्रास होईल असा मंडप उभारा, धडकी भरेल आणि कानठळ्या बसतील असा डीजे लावा, सण व उत्सवातील पावित्र्य भंग कराअसे अजिबात सांगितलेले नाही.

आता करोनाच्या निमित्ताने का होईना आपल्या सण आणि उत्सवातील अपप्रवृत्ती दूर करण्याची संधी मिळाली आहे. तिचा उपयोग करून घेऊन आपण सर्वानीच लोकमान्य टिळक यांच्या मनातील सार्वजनिक गणेशोत्सव पुन्हा नव्याने सुरू करू या.

शेखर जोशी यांच्या फेसबुक पेजवरून

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email