बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभागसंख्येचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात, १८ मे रोजी सुनावणी
मुंबई दि.११ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याबाबतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या निर्णयाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाने उच्च न्यायालयाने या प्रकरणी दिलेल्या निर्णयाला बुधवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
फलाट सोडून लोकल तीन डबे पुढे – विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार
या याचिकेवर १८ मे रोजी सुनावणी होणार आहे. शिंदे सरकारचा प्रभागसंख्या पूर्ववत करण्याचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने असून तो वैधच आहे, असे नमूद करून शिंदे सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱया याचिका उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळल्या होत्या.
शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी या याचिका केल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पेडणेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुदत संपत आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी दिले होते. शिवाय ११ मार्च २०२२ पूर्वीची प्रभागसंख्या त्यासाठी ग्राह्य धरण्याचेही स्पष्ट केले होते.