* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मुंबई आसपास संक्षिप्त – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

मुंबई आसपास संक्षिप्त

मेट्रो २ बीसाठी स्वतंत्र विद्युत पुरवठा

मुंबई दि.०८ :- पश्चिम उपनगरांना पूर्व उपनगराशी जोडणाऱ्या ‘मेट्रो २ बी’साठी स्वतंत्र विद्युत यंत्रणा उभारली जाणार आहे. तब्बल ४०० मेगावॉट विजेची ही यंत्रणा आवश्यकतेनुसार मेट्रोला अहोरात्र पुरविण्यास सज्ज असेल. या मेट्रोच्या वीज पुरवठ्यासाठी ११० किलोव्हॅट क्षमतेची दोन उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. ११० केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राची क्षमता जवळपास २०० मेगावॉट असते. त्यानुसार ४०० मेगावॉट वीज ही दोन उपकेंद्रे सामावून घेतील. ही वीज ३३ केव्ही व २५ केव्ही क्षमतेच्या वीज वाहिन्यांद्वारे मेट्रोसाठी वितरित केली जाईल. ही वीज मेट्रो रेल्वेसह मंडाला येथील डेपोला अहोरात्र पुरवली जाणार आहे.

 

वीज चोरीविरोधात ‘महावितरण’ ची कारवाई

कल्याण – महावितरणच्या कल्याण पूर्व एक उपविभागात वीज चोरांविरुद्धची धडक कारवाई तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत कल्याण पूर्व भागातील १३ बंगले मालकांनी वीज मीटरमध्ये फेरबदल करुन चोरुन वीज घेऊन विजेचा वापर केला असल्याचे उघड झाले आहे. या १३ बंगले मालकांनी ७८ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी केली आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली.

अजामीनपात्र अटक वॉरंटवर कारवाई का नाही?

मुंबई – बनावट जात प्रमाणपत्राप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटवर कारवाई का केली नाही ? अशी विचारणा शिवडी महानगरदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना केली. त्याचवेळी राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात न्यायालयाने चौथ्यांदा अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. आधीच्या अजामीनपात्र अटक वॉरंटवर कारवाई न करण्याच्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर महानगरदंडाधिकारी पी. डी. मोकाशी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच याबाबत पोलीस आयुक्तांसह लोकसभा अध्यक्षांनाही पत्र लिहिले असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आर्थिक मदत मिळावी

मुंबई – समूह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) आर्थिक साहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी येथे केले. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे शिष्टमंडळ राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी ‘वर्षां’ निवासस्थानी शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध पायाभूत आणि सामाजिक आर्थिक उन्नती साधणाऱ्या प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालक समीरकुमार खरे, चिंताले वाँग, सेर्जिवो लुगॅरेसी, ताकीओ कोनाशी उपस्थित होते.

 

‘कडोंमपा’तील २४ रस्ते ‘एमएमआरडीए’ बांधणार

डोंबिवली – कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी ‘एमएमआरडीए’ने पुढाकार घेतला आहे. कडोंमपा क्षेत्रातील पाच कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या २४ रस्त्यांच्या कामांसाठी ३३२.८४ कोटींचा खर्च येणार असून या रस्त्यांच्या कामांसाठी ‘एमएमआरडीए’कडून कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. रस्त्यांची स्थिती सुधारून रस्ते रुंद करण्यासह या रस्त्यांच्या आजुबाजूच्या पर्जन्यवाहिन्या, पदपथ, डांबराचा शोल्डर, सिमेंटचे बांधकाम आणि बाजूच्या जागेमध्ये सेवावाहिन्यांसाठी सोय करण्याच्या कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *