मुंबई आसपास संक्षिप्त

मुंबई दि.११ :-

टेभीनाका येथील आनंदाश्रमात जल्लोष

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकाला दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर टेंभीनाका येथील आनंद आश्रमाबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

 

सागरी किनारा मार्गाचे ७४ टक्के काम पूर्ण

मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाचे ७४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस होता. मात्र वरळी येथील पुलाच्या खांबांमधील अंतर वाढविल्यामुळे बांधकाम कालावधीत वाढ झाली असून हा पूल जून २०२४ पर्यंत वाहतुकीसाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

 

राणी बागेत वाघ आणि पेंग्विनचे बछडे

मुंबई – भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) शक्ती वाघ, करिश्मा वाघिणीच्या जोडीने सहा महिन्यांपूर्वी दोन बछड्यांना जन्म दिला होता. उद्यानाला भेट देणा-या पर्यटकांना आजपासून हे बछडे पाहायला मिळणार आहेत. तसेच आठ महिन्यांपूर्वी जन्मलेले पेंग्विन डोरा, सिरी, निमो हे ही पेंग्विन कक्षात पाहायला मिळणार आहेत.

 

कडोंमपा हद्दीतील जुन्या तलावांचे सुशोभिकरण

डोंबिवली – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जुन्या तलावांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. अमृत टप्पा दोन योजनेतून हे तलाव पुरुज्जीवित आणि सुशोभित करण्यासाठी शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी महापालिकेने २८ कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे.

 

नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे ८० टक्के काम पूर्ण

ठाणे – बेसुमार पाणी वापराला आळा बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू आहे. जलमापके बसविण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. नळजोडणीधारकांना यंदाच्या आर्थिक वर्षात जलमापकांच्या नोंदीप्रमाणेच देयक आकारले जाणार आहे. उर्वरित २० टक्के जलमापके बसविण्याचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

 

कल्याण-शिळफाटा रस्तेबाधित शेतकऱ्यांना मोबादला मिळणार

कल्याण – कल्याण-शिळफाटा रस्तेबाधित शेतकऱ्यांना मोबादला देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिळफाटा रस्ता लगतच्या १८ एकर (७.७६ हेक्टर) खासगी जमिनीचे भूसंपादन आवश्यक असल्याचा अहवाल शासनाला दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिळफाटा रस्ते बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे मोबदला देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.