मुंबई आसपास संक्षिप्त

मुंबईसह राज्यातून मान्सून माघारी

मुंबई दि.२३ :- मुंबई, पुण्यासह राज्यातून परतीचा पाऊस माघारी फिरल्याचे भारतीय हवामान खात्याने रविवारी जाहीर केले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून नैऋत्य मोसमी वारे माघारी परतण्यासाठी ऑक्टोबर महिन्याचा तिसरा किंवा शेवटचा आठवडा उजाडत आहे. रविवारी सकाळच्या अंदाजपत्रात वेधशाळेने देशभरातून मान्सून माघारी फिरल्याचे जाहीर केले.

 

चार रेल्वे स्थानकांचा कायापालट

मुंबई – मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे ‘एमयूटीपी ३ अ’ अंतर्गत मुंबई रेल्वेवरील कांदिवली, मिरारोड, कसारा, नेरळ या चार रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.‌ पूर्व-पश्चिम जोडणारे पूल, प्रवासी मागणीनुसार तिकीट खिडक्या, अन्य प्रवासी सुविधा या सुविधांचा यात समावेश आहे.

 

मुंबईत १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदी

मुंबई – मुंबई पोलिसांकडून १ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.‌ या आदेशान्वये पाच माणसांपेक्षा जास्त माणसांना एकत्र येण्यास मुंबईत मनाई करण्यात आली आहे.

 

खवा आणि खाद्य तेल जप्त

कल्याण- अन्न आणि औषध प्रशासनाच्या कोकण विभागातर्फे शुक्रवारी भिवंडी, कल्याण येथे धडक कारवाई करून ३२ लाख रुपयांचा खवा आणि खाद्य तेल जप्त करण्यात आले. कल्याण येथे एका वाहनातून २५ लाख ८२ हजार रुपये किमतीचा खवा तर आणि भिवंडी येथील एका गोदामातून ६ लाख ८१ हजार रुपये किंमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. विविध अन्नपदार्थाची गुणवत्ता आणि दर्जा तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 

आदिवासी पाड्यांत दिवाळी फराळ वाटप

मुलुंड – येथील ३ आणि मुंबईतील ७ कुटुंबीयांनी खोडाळा गाव, मोखाडा तालुका येथील आदिवासी पाड्यांमध्ये नुकतेच दिवाळीच्या फराळाचे वाटप केले. गिरीवासी सेवा मंडळ संचालित मुरलीधर नानाजी मोहिते गुरुजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे हा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील, सल्लागार श्रीनिवास सावरगावकर आणि त्यांच्या सहका-यांनी सर्व आदिवासींना एकत्र आणण्याचे काम केले.‌ मुलुंडमधील प्रसाद नूलकर, नितीन जोशी, चंद्रशेखर मायदेव तर मुंबईमधील विकास हर्चेकर, चंद्रकांत घोले ,विजय कस्तुरे महेश ठाकूर गौरीशंकर मुदलियार, महेश जेरे, अनिल बोडस, श्रीकांत बोटेकर आदी कुटुंबीयांनी २०० आदिवासी कुटुंबांना हे फराळ वाटप केले.‌

Leave a Reply

Your email address will not be published.