डोंबिवलीच्या औषध निर्माण कंपनीतील स्फोटाला कलाटणी दोन्ही कामगारांचा 8 तासांनी मृत्यू

डोंबिवली दि.२८ – मानपाडा रोडला सांगाव येथिल औषध निर्माण करणाऱ्या एका कंपनीत एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झालेल्या दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या दोन्ही कामगारांचा दुसऱ्या दिवशी दुपारी मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडल्यानंतर आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कमलेश यादव (23) आणि गिरीधर यादव (21) अशी मृत कामगारांची नावे असून हे दोघेही ऐरोली येथिल यादव नगरमध्ये राहणारे होते. डॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि. ही कंपनी डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील प्लॉट नं. ए 1 येथे कार्यरत आहे. या कंपनीत औषध निर्मिती करण्यात येत आहे. सदर कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावरील एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये खासगी ठेकेदाराच्यामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. एअरकंडिशनच्या या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी शक्तिशाली होती की आवाजाने आसपासचे रहिवासी आणि दुकानदार भयभीत झाले होते. कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांसह फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र काही घडलेच नाही या अविर्भावात तेथिल इसम वावरत होते. त्यामुळे सुरूवातीला दुर्घटनेबाबत अधिक तपशील समजू शकत नव्हता.

या स्फोटात कमलेश यादव आणि गिरीधर यादव हे दोघे कामगार जबर जखमी झाले. या कामगारांना तात्काळ निवासी विभागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या दोघांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यामुळे या दोन्ही कामगारांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र तब्बल 8 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या या कामगारांना रविवारी सकाळी साडेपाच वाजता हॉस्पिटल प्रशासनाने मृत घोषित केले. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलकडे पाठविण्यात आले. हे दोन्ही कामगार कृष्णा एंटरप्राईजेस नामक कंपनीसाठी डॉर्टमुंड लॅबोरेटरीज कंपनीत कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरण्याचे काम काम करत होते. या स्फोटात कॉम्प्रेसरसह तेथिल यंत्रसामुग्री जळून खाक झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून सदर जळालेल्या यंत्रसामुग्रीचे भाग हस्तगत केले. फौजदार दिलीप तायडे माहिती देताना म्हणाले, सदर कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावरील एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये खासगी ठेकेदाराच्यामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. मात्र घटनास्थळावर अधिक माहिती देण्यास कुणीही तयार नव्हते, अशी कबूल फौजदार तायडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email