बॉलीवूडची विकृती, भारतीय संस्कृतीची नालस्ती – शेखर जोशी

भारतीय संस्कृती, हिंदू धर्म यांची नालस्ती, टवाळी, मानभंग करण्याचा विडाच जणू काही हिंदी चित्रपटसृष्टीने उचलला आहे, आणि हे सर्व जाणीवपूर्वक, ठरवून केले जात आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.‌

याचे अगदी ताजे आणि ठळक उदाहरण म्हणजे टी सिरीज यांची निर्मिती असलेल्या आणि ओम राऊत दिग्दर्शित ‘आदीपुरुष’ या चित्रपटाची नुकतीच प्रदर्शित झालेली झलक. (टिझर) हा चित्रपट मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची गोष्ट सांगणारा आहे.‌ सुमारे साडेतीनशे ते पाचशे कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. मात्र चित्रपटाची झलक पाहून ‘बॉलीवूडची विकृती भारतीय संस्कृतीचे नालस्ती’ हाच एक शमात्र उद्देश असल्याचे ठळकपणे दिसून येते.

चित्रपटात लंकाधिपती रावण, त्याचे साम्राज्य असलेली लंका, महाबली हनुमान, वानर सेना यांना ज्या प्रकारे सादर करण्यात आले आहे तेच मुळी हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि मूळ रामायणातील ‘रावण’ या पात्राची आपल्या मनात जी प्रतिमा ठसलेली आहे त्या प्रतिमेशी अत्यंत विसंगत आहे.

ही झलक पाहताना आपण ‘रामायण’ पाहतोय की ‘जिओटी’ ही वेब सिरीज पाहतोय असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहणार नाही. माझे स्वतःचे वैयक्तिक मत असे आहे की ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटात दाखविण्यात आलेला ‘रावण’ आपण स्वीकारू शकणार नाही, निदान मी तरी नाही.

गेल्या दोन दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि निर्मिती संस्था असलेल्या टी सिरीजला प्रेक्षक शिव्यांची लाखोली वाहत आहेत. ओम राऊत यांच्या ट्विटर अकाउंटवर प्रेक्षकांनी नोंदविलेला निषेध आणि त्यांनी व्यक्त केलेला राग प्रतिक्रियांच्या स्वरूपात वाचू शकतो.

हे हि वाचा – मुंबई दूरदर्शनची पन्नाशी – शेखर जोशी

भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, पौराणिक व्यक्तिरेखा यांची जी प्रतिमा हजारो वर्षे भारतीयांच्या मनात ठसली आहे ती प्रतिमा तोडण्याचा, डागळण्याचा, त्यांचे विकृतीकरण करण्याचा अधिकार हिंदी चित्रपटसृष्टीला कोणी दिला, हा खरा प्रश्न आहे.

चित्रपट निर्मिती स्वातंत्र्य, दिग्दर्शकीय स्वातंत्र्य, काहीतरी वेगळे करून दाखवण्याचे स्वातंत्र्य याच्या नावाखाली फक्त आणि फक्त हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीचीच टिंगल टवाळी का केली जाते? येशू ख्रिस्त किंवा मोहम्मद पैगंबर यांना किंवा इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माबाबत असे काही विकृत स्वरूपात दाखवण्याची हिंमत हिंदी चित्रपट सृष्टीने याआधी कधी दाखविली नाही आणि भविष्यातही कधी दाखविणार नाही.

हिंदू धर्मीय मुळातच सहिष्णू असल्यामुळे किंवा आपल्या स्वतःचा धर्म, संस्कृती याविषयी मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मियांइतका कडवा नसल्यामुळे आपल्यावर ही वेळ येत असावी. पण आता हळूहळू का होईना अनेकांच्या मनात जाज्वल्य देशाभिमान, हिंदू धर्माभिमान जागृत झाला तर काय होऊ शकते हे आमिर खानच्या ‘लालसिंग चढ्ढा’ चित्रपटाने दाखवून दिले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानेही तथाकथित आणि ढोंगी पुरोगामी, डावे, काँग्रेसी, धर्मनिरपेक्षवादी या सर्वांनाच चांगली चपराक लगावली.

लंकाधिपती रावण हा विद्वान आणि विविध कलांमध्ये निपुण होता. तो भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. ‘शिवतांडव’ हे स्तोत्र रावणानेच रचले. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमिका साकार केली होती. त्रिवेदी यांनी सादर केलेला ‘रावण’ आजही अनेकांच्या मनात ठसलेला आहे.

‘स्वयंवर झाले सीतेचे’ या मराठी चित्रपटात अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी ‘रावण’ साकारला होता. या चित्रपटात चंद्रकांत यांच्यावर चित्रित झालेले आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘रम्य ही स्वर्गाहून लंका’ हे गाणे आजही अनेकांच्या ओठावर आहे.

https://youtu.be/juq16lSm6KA

लंकाधिपती रावण यांचे साम्राज्य अर्थातच लंकानगरी सोन्याची होती असे दाखले पुराणांमध्ये आहेत. ‘आदीपुरुष’ चित्रपटात दाखवलेली लंका आपल्या मनात तयार झालेल्या लंकेच्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे. या चित्रपटात अभिनेता सैफ अली खान यांनी रावण साकारला आहे. ‘रामायण’ मालिकेतून आपल्या मनात ‘रावण’ म्हणून जी प्रतिमा साकार झाली होती त्या प्रतिमेला सैफ अली खान याने साकारलेला ‘रावण’ तडा देतो.

सैफ अली खानचा रावण हा लंकाधिपती न वाटता इस्लामी आक्रमक चंगेज खान, अल्लाउद्दीन खिलजी किंवा अफजल खान सारखा दिसतो आणि वाटतो. ‘आदीपुरुष’ या चित्रपटात रावणाला दाढी दाखवली असून डोळ्यात काजळ घातलेले दाखवल्यामुळे तो शंभर टक्के इस्लामी आक्रमकच वाटतो. पौराणिक संदर्भ आणि दाखल्यांनुसार लंकाधिपती रावणाचे ‘पुष्पक’ विमान होते. या चित्रपटात मात्र लंकाधिपती रावण वटवाघुळ किंवा तत्सम बिभत्स अशा प्राण्याच्या पाठीवर बसून येताना दाखवला आहे.

दारासिंह यांनी साकार केलेला ‘रामायण’ मालिकेतील ‘हनुमान’ आपल्या सर्वांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील ‘महाबली हनुमान’ही मनाला तितकासा पटणारा आणि भावणारा नाही. महाबली हनुमानाची वानरसेना इथे ‘चिंपाझी’ या वानर प्रकारातील दाखवली आहे. अभिनेते देवदत्त नागे यांनी चित्रपटातील हनुमान साकारला आहे. दक्षिणेतील सुपरस्टार प्रभास यांनी ‘श्रीराम’ आणि अभिनेत्री क्रिती सलोन यांनी ‘सीता’ भूमिका साकारली आहे.‌

‘आदीपुरुष’ चित्रपटाची झलक पाहून हा चित्रपट आपल्या भारतीय संस्कृतीशी किंवा पौराणिक संदर्भ आणि दाखल्यांवशी अजिबात सुसंगत नाही, असेच म्हणावे लागेल. साडेतीनशे ते पाचशे कोटी रुपये खर्च करून हा भव्य दिव्य चित्रपट तयार करण्यात आला आहे तर तो चित्रपटही भारतीय संस्कृतीशी बाळ जुळणारा असला पाहिजे अशी किमान अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

‘भारत असहिष्णु आहे, हा देश राहण्यालायक नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेते आमीर खान यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. या वक्तव्यामुळे आमिर खान यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली.‌ आमिर खान यांच्या विषयी काही भारतीय प्रेक्षकांच्या मनात अजूनही तिटकारा आहे आणि त्याचाच फटका आमिर खानच्या ‘ लाल सिंग चड्ढा’ला फटका बसला.

हाच कल आता भविष्यातही सुरू राहण्याची शक्यता आहे.‌ बॉलीवूड मधील जे निर्माते, दिग्दर्शक किंवा अभिनेते-अभिनेत्री भारतीय संस्कृती, हिंदू धर्म किंवा देशाचा अपमान करतील, भारतीय संस्कृतीच्या मानबिंदूंची टिंगलटवाळी किंवा निंदानालस्ती करतील त्या सर्वांना भारतीय प्रेक्षकांनी त्यांची जागा आणि लायकी दाखवून दिली आहे आणि यापुढेही दाखवून देतील.

‘बहिष्कार’ हे मोठे अस्त्र देशाभिमानी आणि धर्माभिमानी भारतीयांच्या हाती आहे. भारतीय समाज एखाद्याला जितका डोक्यावर घेतो, व्यक्ती पूजा करतो तितकाच तो त्याला दाणकनकन खालीही आपटतो. भारतीय संस्कृती, हिंदू धर्म याची बदनामी करणाऱ्या बॉलीवूडमधील मंडळीनी लक्षात घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published.