मराठी भाषा दिनानिमित्त कल्याणमध्ये ग्रंथदिंडी
कल्याण दि.२७ :- २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनानिमित्त कल्याणातील बिर्ला महाविद्यालयात ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. या दिंडीमध्ये शाळेतील शिक्षकवर्गासह महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून बिर्ला महाविद्यालयात पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला.
ढोल-ताशाचा गजर आणि जोडीला नऊवारी साड्या परिधान केलेल्या विद्यार्थिनींचे सुंदर असे लेझीम नृत्य यावेळी पहायला मिळाले. तर ग्रंथदिंडीमध्ये महाराष्ट्र संस्कृतीकोश, मराठी वाङमय इतिहास, कुसुमाग्रज, सावित्रीबाई फुले, मराठी वाङमय कोश आदी अत्युच्च ग्रंथसंपदा ठेवण्यात आली होती. याच दरम्यान यावेळी कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनीही ढोल वाजवून, तर माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनीही ताशा वाजवत आपला आनंद व्यक्त केला.